पंढरपूर तिर्हे मार्ग रस्त्याचा वनवास संपणार तरी कधी?; नागरिकांतून संताप

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाराष्ट्रात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनातून स्वप्नात पाहिलेले रस्ते चकाचक होत आहेत. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सोलापूर जिल्ह्यातील सुद्धा मोठमोठे मार्ग चकाचक होत आहेत. सोलापूर कुरुल हा तिर्हे मार्ग या रस्त्याकडे सध्या कुणाचेच लक्ष्य नसल्याचे दिसत आहे. अनेक वर्षांपासून हा राज्य मार्ग जसाच्या तसा आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे ‘मौत का कुआ’सारखे आहे.

    सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. दरवर्षी एक विशिष्ठ ठेकेदार या रस्त्यावरील खड्डे बुजवतो. परंतु, महिन्याच्या आत येथील खड्डे आहे तसेच होतात. त्यामुळे या रस्त्याचे मजबूतीकरण होणे गरजेचे आहे. सध्या पावसाळा असल्यामुळे या रस्त्यावर इतके पाणी साठत आहे की वाहनचालकांना रस्ता आहे की ओढा-नाला हे समजत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्या वाहनचालक व या मार्गावरील नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. परंतु याविषयी स्थानिक नेतेमंडळी काहीही बोलत नाहीत. हे एक वास्तव आहे. शिवाय या मार्गावरून वारीच्या वेळेस अनेक पालख्या येतात, परंतु अद्यापही याविषयी काही प्रकिया झाल्याचे दिसत नाही. अख्या महाराष्ट्रात रस्त्याची कामे सुरू आहेत. तिर्हे मार्ग पंढरपूर हा रस्ता ही डांबरीकरण करून मजबूत व्हावा, अशी मागणी जोर धरत आहे.

    पंढरपूर ते कुरुलपर्यंत रस्ता जीवघेणा झाला आहे. अनेक छोटी-मोठी गावे, साखर कारखाना या मार्गावर आहे. परंतु वाहनचालकांना या मार्गावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन पंढरपूर तिर्हे मार्ग रस्त्याचा प्रलंबित असणारा मार्ग त्वरित करावा, अशी मागणी होत आहे. या मार्गासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद मोहोळ तालुका अध्यक्ष अमोल माळी यांनी आंदोलन करण्याच्या इशारा दिला आहे.