माढा तहसील कार्यालयासमोर सुरु असलेले बेमुदत उपोषण अखेर मागे

    माढा : माढा तालुक्यातील आलेगाव (बुद्रुक), चांदज शिव पादण रस्त्यावर केलेले अतिक्रमण खुले करण्याच्या मागणीसाठी राजेंद्र रामचंद्र देवकर या शेतकऱ्याने सोमवारपासून माढा तहसील कार्यालयासमोर सुरु केलेले बेमुदत उपोषण बुधवारी (दि. २५) तिसऱ्या दिवशी रात्री उशीरा लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

    दरम्यान, देवकर यांच्या आंदोलनास जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी बुधवारी उपोषणस्थळी येऊन पाठिंबा दर्शवला. अतिक्रमण झालेला रस्ता तहसीलदार राजेश चव्हाण यांनी तत्परतेने खुला करावा अन्यथा शेतकऱ्यांसमवेत माढा तहसील कार्यालयासमोर महसूल प्रशासनाचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा इशारा देत देशमुख यांनी आक्रमकता दाखवली होती.

    याबाबत तहसीलदार चव्हाण यांनी बुधवारी रात्री उपोषणस्थळी येऊन प्रभाकर देशमुख व उपोषणकर्ते राजेंद्र देवकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर तहसीलदार चव्हाण यांनी दोन दिवसांत शिव रस्ता खुला करण्याचे लेखी आश्वासनानंतर रात्री ११ च्या सुमारास उपोषण मागे घेण्यात आले. रस्ता खुला होत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्ते देवकर यांनी व्यक्त केला होता. यावेळी नायब तहसीलदार लोकरे, किरण भांगे, पंडीत साळुंखे, संतोष कवले, बालाजी नाईकवाडे, सुधीर गाडेकर यांचेसह अन्य जण उपस्थित होते. माढा पोलिसांचा बुधवारी रात्री फौजफाट तैनात होता.