पालक गमावलेल्या बालकांना संगोपन योजनेचा लाभ द्या; जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या सूचना

    सोलापूर : कोविड संसर्गाने पालक गमावलेल्या जिल्ह्यातील सर्व बालकांचे सर्व्हेक्षण पूर्ण करुन त्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या. महाराष्ट्र शासनाने कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांचे योग्य संरक्षण आणि संगोपन व्हावे यासाठी कृती दलाची स्थापना केली आहे. या कृती दलाची आज शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

    जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, पोलीस उपअधीक्षक सूर्यकांत पाटील, महिला आणि बालविकास अधिकारी डॉ. विजय खोमणे, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी सुधा साळुंके, बालकल्याण समिती सदस्या सुवर्णा बुंदाले आणि विविध नगरपालिकांचे अधिकारी उपस्थित होते.

    बैठकीस प्रारंभी डॉ. खोमणे यांनी कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांची जिल्ह्यातील स्थिती सांगितली. त्यांनी सांगितले की, 21 बालकांचे दोन्ही पालक मृत्युमुखी पडले आहेत. एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या 608 आहे. त्यापैकी 246 बालकांचे सामाजिक सर्व्हेक्षण करण्यात आले असून, 134 बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ दिला आहे. अद्याप 268 बालकांचे सामाजिक सर्व्हेक्षण करणे बाकी आहे. हे सर्व्हेक्षण येत्या दोन दिवसांत पूर्ण होईल. यावर शंभरकर यांनी जिल्ह्यातील सर्व बालकांचे सर्व्हेक्षण येत्या आठवड्यात पूर्ण करा, त्यासाठी लागणाऱ्या निधीची शासनाकडे मागणी करा. निरीक्षकांना सर्व्हेक्षण करण्यासाठी विहित नमुने तयार करुन द्या, अशा सूचना दिल्या.

    कोविडमुळे पती गमावलेल्या महिलांना राज्य अथवा केंद्र सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनेतून लाभ देण्यासाठी त्यांचे अर्ज भरुन घ्यावेत. यासाठी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना सूचना द्याव्यात, असे शंभरकर यांनी सांगितले.

    यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शेगर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयीन अधीक्षक पैठणकर, चाईल्डलाईन 1098 सोलापूरचे प्रकल्प समन्वयक आनंद ढेपे, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अतिश बोराडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे, परिवीक्षा अधिकारी दीपक धायगुडे, जिल्ह्यातील सर्व तालुका संरक्षण अधिकारी आदी उपस्थित होते.