…तर ही कसली लोकशाही : राज्यपाल कोश्यारी

    अकलूज : लोकांनी लोकांच्या हितासाठी आपणास निवडून दिले आहे. राजकीय हेतूपोटी आपण त्यांचीच अडवणूक केली तर लोकशाही कसली असे म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र सरकारच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत मी या प्रकरणात स्वतः लक्ष घालतो, असे आश्वासन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासमवेत भेटीसाठी आलेल्या शिष्टमंडळाला दिले.
    मंगळवारी (दि. २०) विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली अकलूज-माळेवाडी या ग्रामपंचायतींचे नगरपालिकेमध्ये व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर व्हावे या मागणीसाठी राजभवन येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील, अकलूज ग्रामपंचायतीचे उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, नातेपुते ग्रामपंचायतीचे उपसरपंच अतुल पाटील, मामा पांढरे, माळेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच जालिंदर फुले हे यांचे शिष्टमंङळ गेले होते.
    यावेळी शिष्टमंडळाने आपली अडचण त्यांच्यापुढे मांडली व गेल्या एका महिन्यापासून सुरु असलेल्या साखळी उपोषणाची व उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची कल्पना दिली.
    राज्यपाल कोश्यारी म्हणाले, लोकांची कामे तत्परतेने झाली पाहिजेत. राजकीय समीकरणे जुळवण्याच्या नादात लोकांवर अन्याय करणे लोकशाहीसाठी घातक आहे. मी स्वतः या प्रकरणाची माहिती घेतो, असे आश्वासन दिले.
    अकलूज येथे सुरु असलेल्या साखळी उपोषणामध्ये सरकारला जाग आणण्यासाठी विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली. यामध्ये सरकारचा दहावाही घालण्यात आला. तालुक्यातील जवळपास ९५ संघटनांनी या उपोषणाला आपला पाठिंबा दिला आहे.