भारतीय जनता पार्टी ही भारतीय जनतेचा पैसा लुटणारी पार्टी; काँग्रेस नेत्याची टीका

    सोलापूर : केंद्रातील भारतीय जनता पार्टी चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल-डिझेल, एलपीजी गॅस खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाईने जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. या जीवघेण्या महागाईविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला.

    या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून सोलापूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष प्रकाश वाले व जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी काँग्रेस भवन सोलापूर येथून सायकल रॅली काढण्यात आली. रंगभवन मार्गे डफरीन चौक मार्गे नवल पेट्रोलपंप येथे सायकल रॅली विसर्जित करण्यात आली. या रॅलीत बैलगाडीवर वाले, प्रकाश पाटील व पदाधिकारी लक्ष वेधून घेत होते. सायकल रॅलीतील कार्यकर्ते मोदी सरकारविरोधात जोरजोरात घोषणाबाजी करून मोदी आणि भाजप सरकारचा निषेध व्यक्त केला.

    प्रकाश वाले म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार रोजच पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या किमती वाढवत आहे. गॅस सिलेंडरची सबसिडीही बंद केली आहे. रोजच वाढणारी पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ, खाद्यतेल महाग झाले. दररोज वाढत चाललेली ‌महागाई यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांचे कंबरडे मोडले आहे. जगणे कठीण झाले आहे. मनमोहनसिंग यांच्या काळात कच्च्या तेलाचे दर 108 ते 150 रुपये डॉलर प्रति बॅरल असतानाही 72 रुपये पेट्रोलचे दर होते. आज मोदी सरकारच्या कार्यकाळात कच्च्या तेलाचे दर 30 ते 70 डॉलर प्रति बॅरल एवढे कमी झाले असतानाही आज 106.40 रुपये पेट्रोल, डिझेल 95.54 रुपये गॅस सिलेंडर चे 843 रुपये दर सोलापुरात आहेत.

    संपूर्ण जगभरात इंधनावर सर्वात जास्त कर मोदी सरकार वसूल करत आहे. देशातील जनता कोरोनाच्या संकटाने, महागाई, बेरोजगारीने त्रस्त झालेली असताना जनतेला आधार देण्याऐवजी मोदी सरकार पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे दर सातत्याने वाढवून स्वतःच्या तिजोऱ्या भरण्यात मग्न आहे. जनता जगली काय किंवा मेली काय याच्याशी त्यांना काडीमात्र घेणेदेणे नाही. भारतीय जनता पार्टी ही आजची भारतीय जनतेचा पैसा गोळा करणारी पार्टी झाली आहे. म्हणून महागाईच्या आगडोंबात जनतेला होरपळवणाऱ्या मोदी सरकारचा आम्ही धिक्कार करतो आणि मोदी सरकारच्या निषेधार्थ ही सायकल रॅली काढण्यात आली. मोदी सरकारने इंधनाच्या, गॅस सिलेंडरचे दर ताबडतोब कमी करावे अन्यथा कॉंग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

    यावेळी सोमपा गटनेते चेतन नरोटे, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, नगरसेवक रियाज हुंडेकरी, विनोद भोसले, हाजी तौफिक हत्तुरे, नगरसेविका परवीन इनामदार, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, देवाभाऊ गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, लक्ष्मीकांत साका, युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, भटक्या विमुक्त अध्यक्ष भारत जाधव, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, सेवादलचे भीमाशंकर टेकाळे यांच्यासह इतर पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.