पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपाचे समाधान आवताडे विजयी ;  राष्ट्रवादीच्या ‘भगीरथ’ प्रयत्नांना अपयश; तर भाजपाचे झाले ‘समाधान’

सत्ता नसतानाही भाजपाने विजयश्री आणली खेचून

  पंढरपूर : दिवंगत आ. भारतनाना भालके यांच्या निधनामुळे लागलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ही जागा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना खेचून आणली आहे. भाजपचे समाधान आवताडे हे ३५०३ इतके मताधिक्‍य मिळवून विजय झाले आहेत. समाधान आवताडे यांना १,०७७७१ मते, तर भगीरथ भालके यांना १,०४२७१ मते मिळाली आहेत. निवडणूक निकालानंतर मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आणि फटाके फोडून एकच जल्लोष केला.

  पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मतदारांचा भाजपा तसेच समाधान आवताडे यांच्यावर विश्वास असल्याचे दिसून आले. या मतदारसंघात भाजपा व राष्ट्रवादी यांनी पक्षाची उमेदवारी देताना अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चाचपणी केली होती. समाधान आवताडे यांनी विकासाच्या मुद्द्यावर, तर भगिरथ भालके यांनी सहानुभूतीच्या मुद्द्यावर मतदारांना आवाहन केले होते. निवडणुकीच्या प्रचारासाठी दोन्ही गटांकडून दिग्गजांना प्रचारात उतरवण्यात आले होते. पण भाजपचा शिस्तबद्ध प्रचार व योग्य नियोजन यामुळे भाजपाचे कार्यकर्ते मतदारसंघातील शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले होते. यामुळेच भाजपाला हा विजय सहज मिळवता आला आहे.

  मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून समाधान आवताडे यांनी घेतलेली आघाडी पुढे कायम ठेवली. पंढरपूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात असला तरी पंढरपूर शहर व तालुका भागातून अठराव्या फेरीत सुमारे एक हजार मतांची आघाडी आवताडे यांच्याकडे होती. त्यामुळे भूमिपुत्र असलेले मंगळवेढा येथील आवताडे यांना अपेक्षेप्रमाणे मताधिक्‍य मिळाले.

  पंढरपूर मंगळवेढा मतदार संघापेक्षा अकलूजकरांना जास्त उत्सुकता

  पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाच्या निवडणूक मतमोजणीची उत्सुकता मोहिते पाटील गटाला मोठ्या प्रमाणात लागली होती. प्रचारासाठी काही दिवस मतदारसंघात मुक्काम करणारे मोहिते पाटील गटाचे नेते आज अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर एकत्र जमून निकालाच्या आकडेवारीचा दिवसभर आढावा घेत होते. भाजपचे उमेदवार विजयाच्या मार्गावर असल्याचा अंदाज आल्यानंतर मोहिते पाटील गटाचे कार्यकर्ते व वरिष्ठ नेते यांनी जेसीबीच्या साह्याने गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.