दीड लाखाची मागणी करत प्रियकराकडून प्रेयसीला ब्लॅकमेल; प्रियकर अटकेत

    अकलूज : प्रेयसीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकराने प्रेयसीला ब्लॅकमेल केल्याची घटना उदयनगर (ता. माळशिरस) येथे घङली आहे. ५ महिन्यांत सुमारे ६ लाख १० हजार रूपये उकळल्याच्या आरोपावरून तसेच पीडित मुलीच्या वडिलांना मारहाण केल्याच्या तक्रारीवरून अकलूज पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.

    याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश नितिन नलवडे (रा. उदयनगर, चौडेश्वरवाडी) हा त्याच्या मोबाईलवरून पीडित मुलीला वारंवार फोन, मेसेज करत होता. जानेवारी २०२१ मध्ये आरोपी सुरेश नितिन नलवडे याने पीडित मुलीला फोन करुन सदाशिवराव माने विदयालय या शाळेजवळ बोलवले व तेथून आनंदी गणेश मंदिर येथे घेऊन गेला होता. त्याठिकाणी बराचवेळ गप्पा गोष्टी केल्या. त्यावेळी त्याने त्याच्या मोबाईलमध्ये पीडित मुलीसोबत फोटो काढले होते. त्यानंतर १५ दिवसांत अधूनमधून फोन करत होता. मात्र, पीडित मुलगी फोन उचलत नव्हती. तरीही आरोपी सुरेश नितिन नलवडे हा पीडित मुलीस वारंवार फोन करत असल्याने एकेदिवशी फोन उचलला, तेव्हा आरोपीने, माझ्या मोबाईलमध्ये तुझ्यासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन, तुझ्या वडिलांना फोटो दाखवेन, तू मला दीड लाख रुपये दे नाहीतर तुझे फोटो व्हायरल करेन अशी धमकी दिली.

    त्यानंतर घाबरलेल्या मुलीने घरातील कोणाला माहिती न होता दीड लाख रुपये त्याला दिले. त्यानंतरही तो वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन गेल्या ५ महिन्यात ६ लाख १० हजार रुपये घेऊनही वारंवार धमकी देऊन पैशांची मागणी करीत होता. तसेच सुरेश नलवडे याच्या मित्राला मार्च २०२१ मध्ये पाठवून पिडीत मुलीकडून ७० हजार रुपये घेऊन गेला. तसेच ६ जूनला  दुपारी बाराच्या सुमारास पीडित मुलीचे वडील घरी असताना आरोपी सुरेश नितिन नलवडे याने पीडित मुलीचे नाव घेऊन मोठ्याने आरडा ओरडा केला.

    नलवडे याचा आवाज ऐकून मुलीच्या वडिलांनी बाहेर येऊन त्यास विचारले, तु कोण आहेस तुझे माझ्या मुलीकडे काय काम आहे असे विचारले तेव्हा त्याने, मी तुझ्या मुलीचा प्रियकर आहे, तुझ्या मुलीला बोलव, असे म्हणाला. त्यानंतर तेवढ्यात पीडित मुलगी घरातून बाहेर आली. तेव्हा त्याने तिचा हात पकडून म्हणाला की, तू मला २ लाख रुपये दे नाहीतर तू माझ्यासोबत चल, असे म्हणून पिडीत मुलीच्या  अंगास झोंबाझोंबी करुन तिचे मनाला लाज वाटेल असे वर्तन केले. त्यावेळी मुलीचे वडील त्याला धरत असताना आरोपी सुरेश नलवडे याने शिवीगाळ, दमदाटी करुन हाताने, लाथाबुक्याने मारहाण केली असल्याची तक्रार पिडीत मुलीचे वडील दिनेश खुबलाल निशाद, सुजयनगर १४, अकलुज ता. माळशिरस यांनी अकलूज पोलिसांत केली आहे.

    दिनेश निशाद यांच्या तकारीवरुन अकलुज पोलीस ठाणेस गु.र.नं. ३८४/२०२१ भा.द.वि.सं.क. 384, 354, 323, 504,506, 34, सह लैंगिक अत्याचारापासून बालकाचा संरक्षण अधिनियम कलम १२, ४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सुरेश नलवडे यास अटक करण्यात आली आहे.

    सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक एस.आर.शिंदे या करीत आहेत.