पंढरपूर तालुक्यात बोगस डॉक्टरला अटक

    पंढरपूर : तालुक्यातील तुंगत येथे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या परवान्याशिवाय वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या रॉयल दिवास बिरेन रा. मूळ पश्चिम बंगाल यास बोगस वैद्यकीय व्यवसाय केल्याच्या आरोपावरून तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

    याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. एकनाथ प्रभाकर बोधले यांना, पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे एक डॉक्टर विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर बोधले यांनी पोलीस प्रशासनास बोलावून धाड टाकली असता, आरोपी रॉय दिवास बिरेन रा. घाट पाटलीना, ता. वडगाव, जिल्हा 24 परगणा, पश्चिम बंगाल हा कोणत्याही परवान्याशिवाय वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे आढळून आले.

    परवानाशिवाय वैद्यकीय व्यवसाय करण्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या जीवाला धोका उत्पन्न होत असल्याने, इंडियन मेडिकल कौन्सिल कलम १९५६, (१५, २) महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट ३३ २ तसेच भागवली ४१९, ४२०, कलमान्वये गुन्हा दाखल करून सदर बोगस डॉक्टरला तालुका पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास एएसआय अशोक जाधव हे करीत आहेत.