मोहोळ पोलिसांनी पकडलेला ‘तो’ ४०० पोती तांदूळ रेशनचा; ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

    मोहोळ : मोहोळ पोलिसांनी पकडलेला ‘तो’ ४०० पोती तांदूळ रेशनचा असल्याचे निष्पन्न झाले आले. याबाबत मोहोळ पोलिस कसून तपास करत कनिष्ठ वैधानिक अधिकारी, अन्न विश्लेषक जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सोलापुर यांच्याकडे पाठपुरावा करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी दोषी आढळलेल्या पंढरपूर तालुक्यातील दोघांसह एकूण ५ जणांविरोधात अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम-३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

    याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ट्रक भरून रेशनचा माल काळ्याबाजारात विक्रीसाठी घेऊन निघाला असल्याची गोपनीय माहिती मोहोळ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार २९ मे रोजी १२.३० वाजण्याच्या सुमारास एम एच १२ ई एफ १३७४ या क्रमांकाचा ट्रक सावळेश्वर टोळ नाक्याजवळ आल्यानंतर थांबविण्यात आला. त्यातील दोघांकडे चौकशी केली असता त्यांचे नाव हरिदास नारायण माळी व महेश हणमंत फडतरे दोघे रा. तुगंत ता. पंढरपुर असे असल्याचे त्यांनी सांगितले. या गाडीमध्ये ४०० कट्टे तांदूळ असून तो सुपे जिल्हा अहमदनगर येथील गजानन अँग्रो सेल्स यांचेकडे घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले होते. तांदूळ हा स्वस्त धान्य दुकानातील असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी शहानिशा करण्यासाठी ट्रक व त्या दोन इसमांना ताब्यात घेऊन मोहोळ पोलिस ठाण्यात हजर केले होते.

    ७ जून रोजी त्या ट्रकमधील तांदळाचे नमुने दोन पंचासमक्ष घेऊन ते पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, ताब्यात घेण्यात आलेल्या या ट्रकमधील ४०० कट्टे तांदूळ हे शासकीय वितरण प्रणालीतील असल्याचे निष्पन्न झाले आहे.

    यातील सादीक जावेद कलबुर्गी रा. शेळगी रोड सोलापूर, वसीम नसरूददीन शेख रा. जोडभावी पेठ सोलापूर, अझहर महमंद कलबुर्गी रा. जोडभावी पेठ सोलापुर यांनी संगनमत करून शासकीय वितरण प्रणालीतील तांदूळ कमी किमतीत घेऊन बाहेर काळ्या बाजारात विकून ज्यादा पैसे कमविण्याच्या उद्देशाने ट्रक क्र एम एच १२ ई एफ १३७४ मधून नेत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ट्रकचालक हरिदास नारायण माळी रा. तुगंत ता. पंढरपुर, क्लिनर महेश हणुमंत फडतरे रा. तुगंत ता. पंढरपुर यांना हाताशी धरून त्यांचे ४०० कट्टे शासकीय वितरण प्रणालीतील तांदुळ सुपे जि अहमदनगर येथे घेऊन जात असताना ट्रकचे किंमत अंदाजे १० लाख रूपये व ४०० कट्टे तांदूळ किंमत ४ लाख २९ हजार ५६८ रूपयांचा असा एकूण १४ लाख २८ हजार ५६८ रूपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आला. अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक डुणगे हे करत आहेत.