बंद घराचे कुलूप तोडून ४९ हजारांचा ऐवज लंपास

    सोलापूर : बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने ४९ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना १६ ते १७ जुलैदरम्यान एन जी मिल सोसायटी (आसरा चौक, होटगी रोड) येथे घडली. याप्रकरणी नागनाथ अप्‍पाशा मंदोली (वय ३५, रा. एन जी मिल सोसायटी आसरा चौक, होटगी रोड, सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

    याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांच्या बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर किचनमधील लोखंडी कपाट उचकटून स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलेले 21 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, 9 हजार रुपये किमतीची तीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 9 हजार रुपये किमतीची तीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व रोख रक्कम 10 हजार रुपये असा एकूण ४९ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.

    तसेच फिर्यादीच्या घराशेजारी राहणाऱ्या सना गफुर शानवाले यांचे देखील बंद घराचे लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून हॉलमधील कपाटातील सामान अस्ताव्यस्त टाकून रोख रक्कम चोरून नेली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल घुगे हे करीत आहेत.