‘त्या’ ठेकेदारावर गुन्हा दाखल करून योजनेची रक्कम वसूल करावी; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

  मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : तालुक्यातील वडवळ गावात सुरू असलेल्या मुख्यमंत्री पेयजल योजनेत आर्थिक घोटाळा झाला असून, ठेकदाराने काम देखील निकृष्ट दर्जाचे केले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करून योजनेची रक्कम वसूल करावी, अशी मागणी मोहोळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात २३ सप्टेंबर रोजी मोहोळ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष राहुल मोरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

  मुख्यमंत्री पेयजल योजनेचे काम गेल्या पाच वर्षांपासून वडवळ गावात सुरू आहे. मात्र हे काम करणाऱ्या ठेकेदाराने या योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे. पाईपसह अन्य साहित्य देखील दुय्यम दर्जाचे वापरल्याने योजना पूर्ण होण्यापूर्वीच खराब झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे टाकण्यात आलेले पाईप बनावट कंपनीचे असून आतापासूनच चिरायला सुरुवात झाली आहे. ही योजना तब्बल ४५ लाखांची असून ठेकेदाराने मोठा आर्थिक गैरव्यवहार केला आहे.

  ही योजना पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतीकडे वर्ग केली जाणार आहे त्या नंतरचा देखभाल दुरुस्तीचा खर्च ग्रामपंचायत प्रशासनाला करावा लागणार आहे. मात्र दुय्यम दर्जाचे साहित्य वापरून केलेल्या कामामुळे देखभाल दुरुस्तीचा खर्च योजनेच्या मूळ रकमेच्या आसपास जाऊ शकतो त्यामुळे ग्रामपंचायतीला देखील याचा नाहक त्रास होणार आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराची चौकशी करून त्याच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत. तसेच त्याच्याकडून योजनेसाठीची रक्कम वसूल करून घ्यावी अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने २३ सप्टेंबर रोजी मोहोळ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष राहुल मोरे यांनी दिला आहे.

  याबाबतचे निवेदन प्रभारी तहसीलदार लिंबारे यांना देण्यात आले आहे. यावेळी राहुल मोरे यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यांनादेखील देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील अन्य गावात झालेला गैरप्रकार देखील चव्हाट्यावर येऊ शकतो.

  सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ही योजना कार्यान्वित असून ठेकेदारांनी आर्थिक लाभासाठी या योजनेची कामे निकृष्ट दर्जाची केली आहे. त्यामुळे पाण्यासाठी असलेल्या योजनेचा पैसाच पाण्यात गेला आहे. याची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.

  – राहुल मोरे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मोहोळ