अवैध तांदूळ वाहतूक करणारा ट्रक पकडला; कामती पोलिसांची कारवाई

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : तालुक्यातील कामती पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शनिवारी (दि.१७) अवैध तांदूळ वाहतूक करणारा ट्रक पकडून त्यातील ४ लाख रुपयांचा तांदूळ व ११ लाख रुपयांचा ट्रक असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तीन जणांवर कामती पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत कामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जुलै रोजी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान कामती पोलीस ठाण्याला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. मंद्रुप ते कामती रोडवर ट्रक (क्रमांक एम एच १३ ए एक्स २२४४) मधून मोठ्या प्रमाणात अवैध तांदळाची वाहतूक होणार आहे. त्यावेळी कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार के एस नाईकवाडे, पोलिस हेड कॉन्स्टेबल कोटमळे, कासले, पोलिस नाईक नायकोडे यांच्या पथकाने कोरवली येथील जिल्हा परिषद शाळेजवळ जाऊन सापळा लावला.

    त्यावेळी या क्रमांकाचा ट्रक हा मंद्रुप रोडने कोरवली गावातून जात असताना पोलिसांनी पकडले. यातील चालकाला थांबवून त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने पहिल्यांदा उडवाउडवीची उत्तरे देऊन वाहतुकीची पावती दाखवली. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता पाठीमागे तांदळाची पोती मिळून आली. त्यालगत रंगीबेरंगी गोण्यामध्ये तांदूळ भरून सुतळीने बांधलेल्या गोण्या दिसून आल्या. त्यावरून सदरचा माल अवैधपणे वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने हा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला.

    याप्रकरणी पोलिसांनी महसूल विभागाशी पत्रव्यवहार करत तांदूळ तपासणी करता ताब्यात घेतला आहे. या ट्रकमध्ये एकूण १९ हजार ९०० किलो इतका तांदूळ अंदाजे एकूण रक्कम ४ लाख १७ हजार ९०० रु व ११ लाख १७ हजार ९०० रुपयांचा ट्रक असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तांदूळ वाहतूक करणारा सागर तानाजी लवटे (रा. तिऱ्हे ता उत्तर सोलापूर) व त्याचे साथीदार रवि म्हमाणे (रा. शिंगोली ता मोहोळ), सचिन सावकार (रा. विजयपूर) यांच्याविरोधात कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने करत आहेत.