बकरी ईद साधेपणाने साजरी करा; जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आवाहन

    सोलापूर : कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 21 जुलै 2021 रोजी होणारी बकरी ईद कोरोनाचे नियम पाळून घरीच साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. बकरी ईद समन्वय बैठकीत शंभरकर बोलत होते.

    यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एन.ए. सोनवणे, पोलीस उपअधीक्षक सूर्यकांत पाटील, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव, पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, कैलास काळे, अन्न व औषध प्रशासनच्या अन्न सुरक्षा अधिकारी नसरिन मुजावर, पशुधन विकास अधिकारी डॉ. गजेंद्र अंबलकर, महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक श्री. सातपुते, अशासकीय सदस्य केतन शहा आदी उपस्थित होते.

    शंभरकर यांनी सांगितले की, कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून बकरी ईदची नमाज घरीच अदा करावी. जनावरांचे बाजार भरणार नसल्याने बकऱ्यांची खरेदी ऑनलाईन किंवा दूरध्वनीद्वारे करावी. शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानीवर भर द्यावा.

    ईदनिमित्त नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये. शासन, स्थानिक प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असून, महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या जागेतच बकऱ्यांची कुर्बानी द्यावी, असे आवाहनही शंभरकर यांनी केले.