कार्तिकी यात्रा (kartiki yatra) आषाढीप्रमाणेच प्रतिकात्मक पद्धतीने साजरी करा
कार्तिकी यात्रा (kartiki yatra) आषाढीप्रमाणेच प्रतिकात्मक पद्धतीने साजरी करा

परंतु, या प्रस्तावाला पंढरपुरातील काही वारकरी संघटना, सांप्रदायांनी विरोध दर्शविला आहे. या वारकर्‍यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. यामुळे मर्यादित वारकर्‍यांच्या उपस्थितीतच कार्तिकी वारी साजरी करा, असे पटोले यांनी म्हटले आहे. कोरोनाचे संकट पाहता २६ नोव्हेंबर रोजी होणारी कार्तिकी यात्राही आषाढीप्रमाणे प्रतिकात्मक करावी.

पंढरपूर : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव पुन्हा फोफावण्यास सुरूवात झाली आहे. राज्य सरकार कोरोनाला आळा घालण्याचा अटोकाट प्रयत्न करत आहेत पण या प्रयत्नांवरही मर्यादा येत आहेत. या सर्व बाबींचा विचार करता या वर्षीची कार्तिकी यात्रा आषाढी यात्रेप्रमाणे प्रतिकात्मक स्वरुपात साजरी करावी, असा प्रस्ताव सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी राज्य सरकारकडे पाठवला आहे. बाहेरून येणार्‍या दिंड्यांना पंढरपुरात परवानगी देण्यात येऊ नये, असे या प्रस्तावात म्हटले आहे.

परंतु, या प्रस्तावाला पंढरपुरातील काही वारकरी संघटना, सांप्रदायांनी विरोध दर्शविला आहे. या वारकर्‍यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. यामुळे मर्यादित वारकर्‍यांच्या उपस्थितीतच कार्तिकी वारी साजरी करा, असे पटोले यांनी म्हटले आहे. कोरोनाचे संकट पाहता २६ नोव्हेंबर रोजी होणारी कार्तिकी यात्राही आषाढीप्रमाणे प्रतिकात्मक करावी.

यात्रेच्या कालावधीत एकादशी सोहळ्याच्या दिवशी ७ ते ८ लाख भाविकांची गर्दी होते. त्यामुळे ही गर्दी मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, ६५ एकर येथे केंद्रीत झाल्यास कोरोनाचा मोठा धोका होऊ शकेल. यामुळे कार्तिकीला कोणत्याही दिंड्यांना अथवा वारकर्‍यांना पंढरपूरमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये, असा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी अभिप्राय देत तो प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार तो प्रस्ताव ८ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारला विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून पाठविण्यात आला आहे. दरम्यान, वारकरी सांप्रदायाच्या महाराज मंडळींनी १८ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विधानसभा सभापती नाना पटोले यांच्याशी चर्चा केली. यामध्ये मर्यादित स्वरुपाच्या यात्रेला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे वारकरी सांप्रदायाच्यावतीने सांगण्यात आले.

दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर राज्य सरकारने राज्यातील मंदिरे भाविकांना दर्शनाकरिता खुली केली आहेत. त्यानुसार पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही खुले करण्यात आले आहे. दररोज दोन हजार भाविकांना नियम व अटींचे पालन करूनच दर्शनास सोडण्यात येत आहे. या अनुषंगाने सरकारने यात्रेला प्रतिकात्मक न करता परंपरेने साजरी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी वारकरी सांप्रदायाकडून करण्यात येत आहे.

राज्यातील मंदिरे उघडली असली तरी कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही म्हणून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच निर्णय घ्यावा लागणार आहे. आषाढीयात्रेप्रमाणे संचारबंदीमध्ये कार्तिकी यात्रा होणार की, नाना पटोले यांच्या मध्यस्थीने मर्यादित स्वरुपात कार्तिकी होणार, याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत.