आरोग्य विभागाच्या कामाची मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा

    सोलापूर : आरोग्य समिती सभा जिल्हा परिषद सोलापूर येथील शिवरत्न सभागृह येथे उपाध्यक्ष तथा सभापती आरोग्य समिती दिलीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या सुरवातीला दिवंगतांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहून सभेस सुरुवात करण्यात आली.

    सर्व प्रथम जिल्हयातील ग्रामीण भागामध्ये नियोजनबध्द पध्दतीने व कौशल्याने कोवीड-१९ ची साथजन्य परिस्थिती आटोक्यात आणल्याबददल सोलापूर आरोग्य विभागाचे आषाढी वारीमध्ये मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले. त्या अनुषंगाने आजच्या आरोग्य समिती सभेमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांचा व त्यांच्या संपूर्ण टीमचा सर्वानुमते अभिनंदनाचा ठराव घेऊन सत्कार करण्यात आला. या सत्कारप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना हा सत्कार माझा नसून आरोग्य समितीच्या सर्व सदस्यांचा व उपाध्यक्ष यांचा आहे.

    यापुढील आगामी काळात सोलापूर जिल्हयातील मंजूर ४३ उपकेंद्र प्रस्तावित असून, आगामी काळामध्ये कुठलेही उपकेंद्र वगळण्यात येऊ नये अशा सर्व सदस्यांनी सूचना मांडल्या व तसेच सोलापूर जिल्ह्यासाठी कोविड-१९ ची जास्तीत जास्त लस उपलब्ध करण्याबाबत चर्चा करण्यात आली व त्याबाबत जास्तीचे लस पुरवठा करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा अशा सदस्यांनी सूचना केल्या.

    प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कंत्राटी वाहनचालकाच्या वेतनाबाबत उच्च न्यायालयाने केलेल्या निर्देशानुसार कार्यवाही होण्याबाबतच्या सूचना सदस्यांनी केल्या. या सभेला निलकंठ देशमुख, अरुण तोडकर, अण्णासाहेब बाराचारे, अतुल खरात, स्वाती कांबळे, रुक्मिणी ढोणे तसेच अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधीकारी डॉ. सोनिया बागडे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. अनिरूध्द पिंपळे, तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.