Discharge of 2.5 lakh water from Ujani possibility of flood-like situation in Pandharpur
उजनीतून पावणेदोन लाख पाण्याचा विसर्ग, पंढरपुरात पूर सदृश्य परिस्थितीची शक्यता

    सोलापूर / प्रतिनिधी : सोलापूर शहरातील नागरिकांना पिण्यासाठी उजनी धरणातून दरवर्षी १.७४ टीएमसी पाण्याची गरज आहे. परंतु प्रत्यक्षात दरवर्षी २० ते २२ टीएमसी पाणी भीमा नदीत सोडावे लागत आहे. त्यामुळेच दरवर्षी उजनी धरणातील पाणीसाठा मायनसमध्ये जातो. सोलापूर शहरासाठी प्रस्तावित असलेल्या दुहेरी पाईपलाईनचे काम लवकर पूर्णत्वास गेल्यास तब्बल २० टीएमसी पाण्याची बचत होईल. भीमा नदी काठावरील शेतकऱ्यांसाठी दोन्ही हंगामात पाण्याचे आवर्तन सोडण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळून देखील उजनी धरणातील पाणीसाठा मायनसमध्ये जाणार नाही, असा विश्वास लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधिक्षक अभियंता धीरज साळे यांनी व्यक्त केला.

    सोलापूर शहर हे सुमारे १० लाख लोकसंख्या असलेले महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर आहे. या शहराला तीन स्रोतांमधून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. उजनी जलाशयातून ०.९ टीएमसी, भीमा नदीतून ०.७१ टीएमसी आणि एकरूख मध्यम प्रकल्पातून ०.१३ टीएमसी याप्रमाणे एकूण १.७४ टीएमसी पाण्याचे आरक्षण मंजूर आहे. यापैकी भीमा नदीवरील पाणी पुरवठा योजनेसाठी पंपगृह टाकळी येथे आहे. हे पंपगृह भीमा नदीवरील औज व चिंचपूर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्यामधील भागात आहे. औज कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची साठवणक्षमता २०५.६९ दलघफू व चिंचपूर बंधाऱ्याची साठवण क्षमता २०८.५३ दलघफू इतकी आहे. या दोन्ही बंधाऱ्याची एकत्रित साठवणक्षमता ४१२.२२ दलघफू (०.४१ टीएमसी) आहे.

    उजनी धरण ते औज बंधारा हे अंतर २३२ किलोमीटर व उजनी धरण ते चिंचपूर बंधारा हे अंतर २४० किलोमीटर इतके आहे. सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी प्रस्तावित असलेली दुहेरी पाईपलाईन योजना जलदगतीने पूर्णत्वास गेल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होऊन सोलापूर शहरातील नागरिकांना दिवसातून दोन वेळा पाणी उपलब्ध होऊ शकेल, असा आशावाद तज्ञांनी व्यक्त केला आहे.

    उजनी प्रकल्पाच्या मंजूर प्रकल्प अहवालात उजनी धरणातून भीमा नदीत पिण्यासाठी पाणी सोडण्याची तरतूद नाही. तथापि पिण्याच्या पाण्यासाठी प्रथम प्राधान्य असल्यामुळे दरवर्षी जिल्हास्तरीय पिण्याच्या पाणी आरक्षण समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार उजनी धरणातून सोलापूर शहर, पंढरपूर, सांगोला,‌ मंगळवेढा व भीमा नदी तीरावरील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी सुमारे २० ते २२ टीएमसी पाणी भीमा नदीत सोडण्यासाठी उजनी धरणातून आकस्मिक आरक्षण करण्यात येते.

    सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडून एका वेळेस औज व चिंचपूर बंधारे भरून देण्यासाठी उजनी जलाशयातून सुमारे पाच टीएमसी म्हणजे या बंधाऱ्यांच्या साठवण क्षमतेच्या अंदाजे १२ पट पाणी उजनी धरणातून सोडावे लागत आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने उजनी जलाशयावरून सध्याच्या बंद जलवाहिनीला समांतर दुसरी बंद जलवाहिनी वाढीव पाणीपुरवठा योजना प्रस्तावित केलेली आहे.

    पाणी आरक्षणास मान्यता

    महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने सोलापूर शहर पाणीपुरवठा वाढीव योजनेसाठी पिण्यासाठी ६९.६५ द.ल.घ.मी व औद्योगिक वापरासाठी १२.९२ द.ल.घ.मी. असे एकूण ८२.५६ द.ल.घ.मी. (२.९१ टीएमसी / २२२ एमएलडी) ( बाष्पीभवन व्ययासह पाणी आरक्षणास मान्यता दिली आहे.

    – धीरज साळे, अधिक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर.

    …तर मिळेल दिवसातून दोनवेळा पाणी

    सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी प्रस्तावित असलेल्या दुहेरी पाईपलाईनचे काम जलदगतीने पूर्णत्वास नेण्याची गरज आहे. ही योजना प्रत्यक्षात साकार झाल्यास उजनी धरणातील पाण्याची मोठी बचत होणार आहे. दरवर्षी मायनसमध्ये जाणारा उजनी धरणातील पाणीसाठा ‘प्लस’मध्ये राहील. शिवाय सोलापूर शहरातील नागरिकांना दिवसातून दोन वेळा सकाळी आणि संध्याकाळी पाणी उपलब्ध होईल, असा आशावाद तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.