राष्ट्रकुल स्पर्धा विजेते आणि महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख यांचे निधन

आप्पालाल शेख यांच्या घराला कुस्तीचा वारसा आहे. आप्पालाल शेख यांचे बंधू इस्माईल शेख हे 1980 सालचे महाराष्ट्र केसरी होते. त्यांच्यापाठोपाठ 1992 साली आप्पालाल शेख हे महाराष्ट्र केसरी झाले.

    सोलापूर : महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) आणि राष्ट्रकुल स्पर्धा विजेते (Commonwealth Games Winner) आप्पालाल शेख (Appalal Sheikh) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मृत्यू समयी ते 55 वर्षाचे होते. त्यांच्या अकाली जाण्याने कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली.

    राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारे तसेच 1992 साली महाराष्ट्र केसरी किताब पटकावणारे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील पैलवान आप्पालाल शेख यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रासले होते.

    आप्पालाल शेख यांच्या घराला कुस्तीचा वारसा आहे. आप्पालाल शेख यांचे बंधू इस्माईल शेख हे 1980 सालचे महाराष्ट्र केसरी होते. त्यांच्यापाठोपाठ 1992 साली आप्पालाल शेख हे महाराष्ट्र केसरी झाले. 2002 साली त्यांचे पुतणे मुन्नालाल शेख हे देखील महाराष्ट्र केसरी झाले. एकाच घराण्यामध्ये तीन तीन महाराष्ट्र केसरी असलेले राज्यातील आप्पालाल शेख यांचे एकमेव कुटुंब होते. त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये मजल मारत तेथे देखील सुवर्णपदक पटकावले होते. मागील काही दिवसांपासून त्यांना मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रासले होते. गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.