सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव का झाला याचे कोडे काँग्रेसला अजून सुटेना ; प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केली जिल्हा पदाधिकाऱ्यांना विचारणा, पालकमंत्री भरणे यांच्या कार्यपद्धती वरून काँग्रेसमध्ये संताप

आत्ता तयार रहा... महापालिका व जिल्हा परिषदेची निवडणूक तोंडावर आहे दोन्ही ठिकाणी सत्ता आणण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने काम करावे लागेल जे अकार्यक्षम असतील त्यांना तातडीने हटवले जाईल असा इशारा प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी यावेळी दिला.

  सोलापूर : लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव कशामुळे झाला अशी विचारणा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी करताच सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते निरुत्तर झाले. यावेळी काँग्रेस नगरसेवकांनी महापालिका आयुक्त व जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कार्यपद्धतीबाबत संताप व्यक्त केला

  आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीबाबत काँग्रेसची रणनीती ठरवण्यासाठी मुंबईत बुधवारी प्रदेश काँग्रेस कमिटीने सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसाठी बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस खिळखिळी का झाली आहे व लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव का झाला याबाबत पदाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावे असे बैठकीच्या सुरुवातीलाच सुनावले

  जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी काही कारणे सांगितली त्यात पटोले यांचे समाधान झाले नाही त्यानंतर जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी मोदी लाटेमुळे शिंदे यांचा पराभव झाल्याचे सांगितले तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीच्या गेल्या अनेक वर्षात बैठका झाल्या नाहीत वीज कनेक्शन तोडण्यात येतं असल्याने अनेक शेतकरी नाराज आहेत त्यामुळे ही मोहीम थांबवावी अशी विनंती केली त्यावर इतर पदाधिकाऱ्यांनीही आपण सत्तेत असूनही शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे म्हणणे मांडले. त्यावर प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी शेतकऱ्यांचा हा प्रश्न सोडविण्यासाठी मित्रपक्षाबरोबर चर्चा केली जाईल असे सांगितले. तसेच जे पदाधिकारी अकार्यक्षम असतील त्यांना तातडीने पदावरून हटवले जाईल असा इशारा दिला

  या बैठकीला आमदार प्रणिती शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नसीम खान, सोनल पटेल, हुसेन दलवाई , चारुशिला ठोकस, मोहन जोशी, तसेच सोलापूर शहर व जिल्हयातील प्रकाश पाटील, संजय हेमगड्डी, अशफाक बळोरगी, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, नगरसेवक चेतन नरोटे, बाबा मिस्त्री, विनोद भोसले, तौफीक हत्तुरे, नगरसेविका वैष्णवी करगुळे, फिरदोस पटेल, बाबा करगुळे, शिवा बाटलीवाला, गणेश डोंगरे, वाहिद बिजापुरे, शहर महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, नलीनी चंदेले, शौकत पठाण, भारत जाधव, देवा गायकवाड़, राहुल वर्धा, विवेक कंन्ना, संजय गायकवाड़, युवराज जाधव, शाहु सलगर, यशवंत ढेपे, राजेन्द्र शिरकुल, प्रियंका डोंगरे, श्रद्धा हुल्लेनवरु, उपेंद्र ठाकर, लतीफ मल्लाबादकर उपस्थित होते.

  आत्ता तयार रहा… महापालिका व जिल्हा परिषदेची निवडणूक तोंडावर आहे दोन्ही ठिकाणी सत्ता आणण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने काम करावे लागेल जे अकार्यक्षम असतील त्यांना तातडीने हटवले जाईल असा इशारा प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी यावेळी दिला.

  पालकमंत्री भरणेविरुद्ध रोष
  यावेळी काँग्रेस नगरसेवकांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे काँग्रेस पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नसल्याची तक्रार केली काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून अशी दुसऱ्यांदा तक्रार होत आहे तसेच महापालिका आयुक्त पी शिवशंकर हे कोणाचच ऐकत नसल्याची तक्रार केली