Corona Side Effects : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर बंद ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय

पंढरपूर शहर व तालुक्यातील मठांची तपासणी करण्यासाठी उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी चार पथके तयार केली आहेत. या पथकांनी शनिवारी व रविवारी २५७ मठांची तपासणी केली आहे.

    पंढरपूर : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता माधी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील २५७ मठांची पोलिसांनी तपासणी केली असून तालुक्यात २८ ठिकाणी तर शहरात ८ ठिकाणी नाकेबंदी केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली. माघी यात्रेपूर्वीच वारकऱ्यांनी पंढरपूरमधील मठामध्ये मुक्काम केला होता. मात्र पोलीस प्रशासनाने मठात वारकऱ्यांना मुक्काम करू दिल्यास मठाधिपतींवर गुन्हा दाखल करणार असल्याच्या नोटिसा मठात दिल्या आहेत.

    पोलिसांनी मठांची तपासणी करताच ३५ ते ४० हजार भाविक त्यांच्या गावी यात्रेपूर्वीच परतले आहेत. यामुळे माघी यात्रेपूर्वीच पंढरपूर रिकामे होत असल्याचे चित्र आहे.

    पंढरपूर शहर व तालुक्यातील मठांची तपासणी करण्यासाठी उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी चार पथके तयार केली आहेत. या पथकांनी शनिवारी व रविवारी २५७ मठांची तपासणी केली आहे. यामध्ये शहरातील १३७ मठ तर ग्रामीण भागातील १२० मठांची तपासणी केली आहे.

    या तपासणी दरम्यान शनिवारी मठामध्ये भाविक उपस्थित होते. मात्र रविवारी मठांची तपासणी केल्यानंतर मठात आश्रय घेतलेल्या भाविकांची संख्या रोडावली असल्याचे दिसून आले आहे. यासोबतच मठामध्ये अचानक भेट देण्याचे काम पोलिसांकडून होत असल्याने मठातील भाविक आपल्या गावकडे परतण्यावर आग्रही आहेत.