पंढरीत आषाढीपूर्वीच संचारबंदी लागू ; २५ जुलैपर्यंत संचारबंदी कायम!

    मुंबई : आषाढी यात्रेसाठी रविवारपासूनच पंढरपूर शहर आणि परिसरातील गावांत संचारबंदी लागू होत असल्याने अनेक विठ्ठल भक्तांनी नामदेव पायरी येथे येऊन दर्शनासाठी गर्दी केली. संचारबंदीत एसटी आणि खाजगी बससेवा पूर्णपणे बंद असणार आहेत. पंढरपुरात २५ जुलैपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे. आषाढी एकादशी यंदाही कोरोनाच्या संकटात होत असल्याने, केवळ १० मानाच्या पालखी सोहळ्यातील ४०० वारकर्‍यांना पंढरपुरात प्रवेश दिला जाणार आहे. इतर वारकर्‍यांनी प्रवेश करू नये, यासाठी तीन हजार पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना तैनात करण्यात आले आहे.

    केवळ पाच पोलिसांना कोरोना

    यंदा कोरोनाच्या संकटामुळे पहिल्यांदाच पोलिसांची कोरोना तपासणी करण्यात आली. दोन दिवसांत बंदोबस्ताला आलेल्या दोन हजार पोलिसांची तपासणी केल्यावर केवळ पाच कर्मचार्‍यांना कोरोना झाल्याचे दिसून आले आहे. त्यांना विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना यात्रा काळात कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी कोरोना किट देण्यात आल्या आहेत.

    विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई

    रविवारपासून पंढरपूर शहर आणि परिसरातील गावात संचारबंदीला सुरुवात होत असल्याने आज अनेक विठ्ठल भक्तांनी नामदेव पायरी येथे येऊन दर्शनासाठी गर्दी केली. दरम्यान, आषाढीसाठी विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, विविध रंगांच्या दिव्यांनी मंदिर झगमगून निघाले आहे. मंदिराच्या आतील बाजूला देखील आकर्षक रोषणाई करण्यास सुरुवात झाली असून, विठ्ठल सभामंडप झगमगू लागला आहे.