काँग्रेस-राष्ट्रवादी आमदारांच्या सन्मानाला धक्का; जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर सावंतांचीच छबी

  सोलापूर : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असून देखील काँग्रेस राष्ट्रवादी आमदारांच्या सन्मानाला धक्का देण्याचे धाडस सोलापूर जिल्हा परिषदेनी केले आहे. यामुळे सीईओ दिलीप स्वामी यांच्या विरोधात कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळी आहे. पुणे विभाग पदवीधर व शिक्षक संघटनेची निवडणूक होऊन वर्ष होत आले तरी जिल्हा परिषदेच्या अधिकॄत संकेतस्थळावर शिक्षक आमदार म्हणून दत्तात्रय सावंत यांचीच छबी असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता दत्तात्रय सावंत यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे.

  जिल्हा परिषदेत भाजप समविचारी आघाडीची सत्ता आहे. अध्यक्ष हे शिवसेना पक्षातील असल्यामुळे उलट सुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ तयार करून अनेक वर्षे होत आली आहेत. संकेतस्थळावर विविध विभागांच्या माहितीसह पदाधिकाऱ्यांची फोटोसहीत माहिती अपलोड केलेली आहे. घडामोडीसह संकेंतस्थळ अपडेट करण्याची जबाबदारी आयटी सेलवर आहे. पण आयटी सेलचे वेबसाइट अपडेट करण्याकडे लक्षच नसल्याचे दिसून आले आहे.

  पुणे पदवीधर व शिक्षक मतदारांची निवडणूक होऊन वर्ष होत आले. पदवीधर आमदार म्हणून राष्ट्रवादीचे अरुण लाड यांची तर शिक्षक आमदार म्हणून काँग्रेसचे जयंत आसगावकर यांची निवड झाली. तरीपण जिल्हा परिषदेच्या त्यांच्या नावाचे वावडे असल्याचे दिसत आहे. वेबसाइटवर शिक्षक आमदार म्हणून दत्तात्रय सावंत यांचे छायाचित्र, पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक दिलेला आहे. पुणे विभागात शिक्षकांची संख्या मोठी आहे. प्रश्नासाठी शिक्षकांना त्यांना संपर्क करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवरील माहितीसाठी अनेकजण भेट देतात. पण वेबसाइटवरील चुकीची माहिती पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही माहिती निदर्शनाला आणून देऊनही कर्मचाऱ्यांनी आपले काही देणंघेणं नाही, अशी भूमिका घेतली आहे.
  अधिकाऱ्यांची नावे जुनीच

  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांची बदली झाली आहे. तरीही वेबसाईटवर त्यांची फोटोसह नावे आहेत. दरम्यान, याहून धक्कादायक बाब म्हणजे आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार, उपशिक्षणाधिकारी एम. एस. मुजावर यांची केव्हाच बदली झाली. पण लसीकरण समन्वय व अतिरिक्त उपशिक्षणाधिकारी म्हणून वेबसाइटवर ही नावे आहेत. ए.ए. खरे हे केव्हाच सेवानिवृत्त झाले आहेत, पण अजूनही अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून त्यांचे नाव आहे. शिक्षण विभागाचे तालुका समन्वक बदलले आहेत. पण त्यावरही जुन्याच अधिकाऱ्यांची नावे दिसत आहे.

  पदवीधर आमदार अरुण लाड व शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांचे नाव जिल्हा परिषद वेबसाइटवर गाळणे ही गंभीर चूक आहे. राजशिष्टाचाराचे उल्लंघन होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दिपकआब्बा पाटील यांच्याकडे तक्रार करणार आहे.

  – स्वाती कांबळे, सदस्या, जिल्हा परिषद सदस्या