दत्तात्रय भरणे
दत्तात्रय भरणे

  सोलापूर / प्रतिनिधी : सोलापूरसह संपूर्ण जगावर सध्या कोरोना महामारीचे मोठे संकट आहे. कोरोना मुक्तीसाठी प्रत्येक जण आज झटत आहे. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून तालुका आणि गावस्तरावर जाऊन आढावा बैठका घेत आहेत. कोरोनामुक्तीबरोबरच सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न ते धडाडीने करीत आहेत. कोरोनासारख्या गंभीर महामारीच्या काळात तालुका आणि गावस्तरावर जाऊन बैठका घेणारे ते राज्यातील एकमेव पालकमंत्री ठरले आहेत.

  महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सोलापूरला मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे या सोलापूरच्या पालकत्वाविषयी प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, महाविकास आघाडीचे समन्वयक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूरच्या भल्यासाठी म्हणून त्यांच्या अत्यंत जवळचे असलेल्या गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना हे पालकत्व दिले होते. त्यावेळी कोरोनाचा शिरकाव झाला आणि आरोग्याच्या कारणांनी वळसे-पाटील यांनी स्वतःहून हे पालकत्व नाकारले. त्यानंतर शरद पवार यांनी पूर्वीच्याच कृपादृष्टीने गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही सोलापूरला धाडण्याचा निर्णय घेतला.

  दुर्दैवाने आव्हाड स्वतः कोरोनाग्रस्त झाले. त्यामुळे ते सोलापूरला येऊच शकले नाहीत. अशा आणीबाणीच्या स्थितीत सोलापूरचा वाली कोण असा बाका प्रसंग उभारलेला असताना पवार कुटुंबियांचे अत्यंत विश्वासू समर्थक असलेले इंदापूरचे आमदार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोलापूरच्या पालकत्वाची जबाबदारी दिली. त्यानंतर मात्र कोरोनामुक्त सोलापूरसाठी आणि सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठीचा लढा दत्तात्रय भरणे यांनी सुरू केला आहे.

  भरणे हे तर कोरोनातून मुक्त करणारा धडपड्या नेता

  केवळ जबाबदारी दिली. म्हणून नाईलाजाने आलेले ते मामा नव्हते. केवळ साहेब, दादाने सांगितले. म्हणून सोलापूरला चकरा घालणारे ते मामा नव्हते. केवळ झेंडावंदन करायचे म्हणून कलेक्टर कचेरीला येणारे मामा मुळीच नव्हते. या मामांमध्ये दडलेला एक माणूस होता. जो सोलापूरकरांना घेरलेल्या कोरोनातून मुक्त करणारा एक धडपड्या नेता आहे. जोखीम पत्करून पीपीई किट घालणारे एक धाडसी नेतृत्व आहे. त्याच तळमळीने प्रशासकीय आढावा बैठकीत आपत्कालीन व्यवस्थापन पाहणारा एक कुशल प्रशासक देखील आहेत. परंतु म्हणतात ना सद्गुणी व्यक्ती नेहमीच टीकेचे धनी होते. हाच मामांचा चांगुलपणा विरोधकांना, असंतुष्टांना धक्का देणारा ठरला आणि जिथे पाणीच नाही. तिथे काही तरी मुरायला सुरुवात झाली. परंतु, कुठेतरी पाणी मुरते याकडे पाहण्यापेक्षा सोलापूरच्या आरोग्याचे भले कसे होईल. याच दृष्टीने त्यांनी त्यांची धडपड सुरू ठेवली आहे.

  जणू या सोलापूरच्या मातीशी इमान राखणारा हा माणूस इमाने इतबारे काम करतोय. अतिशय पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून सोलापूरच्या विकासासाठी झटतोय. स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून कोरोनाग्रस्तांशी संवाद साधतोय. अशावेळी स्वकीय आणि विरोधकांनी वैयक्तिक स्वार्थापोटी पालकमंत्र्यांनी उभारलेल्या चांगल्या कार्याच्या विरोधात राजकारण सुरू केले. त्यालाही भीक न घालता पालकमंत्र्यांनी आपले काम सुरूच ठेवले आहे. कोरोनासारख्या अतिगंभीर महामारीच्या काळात देखील प्रत्येक तालुकास्तरावर जाऊन आढावा बैठका ते घेत आहेत. अनेक गावांमध्ये जाऊन लोकांशी संवाद साधत आहेत.

  अधिकचा निधी सोलापूर जिल्ह्यात आणून विकासाला गती देण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. त्यांच्या या चांगल्या कामांना विरोधकांबरोबरच स्वकीय विरोधकांची ही नजर लागली आहे. त्याकडे पक्षाच्या हायकमांडने दुर्लक्ष करून भरणे यांना पाठबळ द्यावे, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली. सोलापूरच्या पालकत्वाची जबाबदारी भरणे यांच्याकडेच ठेवल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापूर जिल्ह्यात मोठे पाठबळ मिळेल. शिवाय सोलापूरच्या विकासाला गती ही मिळू शकेल, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका गटाकडून व्यक्त होत आहे.