७१ लाखांची बोली लागलेल्या सोलापूरातील सर्जा मेंढ्याचा मृत्यू…

  पंढरपूर : 71 लाखांची बोली लागलेल्या सोलापूरच्या मेंढ्याचा मृत्यू झाला. मेटकरी कुटुंबाने आपल्या कुटुंबातील सदस्य गमावल्याची भावना व्यक्त केली आहे. निमोनिया संसर्गानंतर उपचारादरम्यान सर्जा मेंढ्याचा मृत्यू झाला. तो अडीच वर्षांचा नर मेंढा होता.

  मेंढ्याला लाखोंची मागणी

  सोलापूर जिल्ह्यात सांगोल्यातील चांडोलेवाडीत राहणारे पारंपरिक मेंढपाळ व्यावसायिक बाबुराव मेटकरी यांचा हा मेंढा होता. माडग्याळ जातीच्या अत्यंत डौलदार सर्जा मेंढ्याला लाखोंची मागणी होती. आटपाडीच्या जत्रेत त्याला 71 लाख रुपयांची बोली लागली होती. सर्जा मेंढाचा माणदेशाची शान आणि भूषण म्हणून ओळखला जात होता. महाराष्ट्र आणि कर्नाटकात हिंदकेसरी म्हणून तो नावाजला गेला होता. दरम्यान अजस्त्र देहयष्टी, देखणं रुप असलेल्या सर्जाचं नाक पोपटाप्रमाणे होतं. हेच त्याचं सौंदर्यस्थळ मानलं जात होतं. सर्जा मेंढा मेटकरी कुटुंबाला वर्षाकाठी 50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून देत होता. मेटकरींनीही आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणूनच त्याला जीव लावला, सांभाळ केला होता.

  दुष्काळामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून काही शेतकरी मेंढीपालनाचा व्यवसाय करतात. या व्यवसायातूनही आता लाखो रुपये कमवता येऊ शकतात, हे समोर आलं आहे. सर्जा मेंढ्याला तीन-चार दिवसांपूर्वी निमोनियाचा संसर्ग झाला होता. आजार बळावल्याने त्याच्यावर पशुवैद्यक डॉक्टरांकडे उपचारही सुरु होते. त्याचा जीव वाचवण्यासाठी मेटकरींनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र गुरुवारी उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला.

  कलप्पांच्या मेंढ्यालाही साडेआठ लाखांची किंमत

  सोलापुरात लाखोंच्या किमतीला विकल्या गेलेल्या मेंढ्यांची आणखीही उदाहरणं पाहायला मिळाली आहेत. सोलापुरात मेंढीपालनाचा व्यवसाय करणाऱ्या कलप्पा यांच्याकडे 35 मेंढ्या आहेत. येईल त्या भावाने ते मेंढ्यांची विक्री करतात. त्यांचा विजापुरी जातीचा मेंढा गेल्या वर्षी साठेआठ लाखाला विकला गेला होता. त्यावेळी तो साधारण दीड वर्षांचा होता. त्याचेही नाक पोपटाच्या आकाराचे होते. त्यामुळे त्याची इतकी किंमत आली होती.