Fraud

    सोलापूर : होटगी रोड येथील किनारा हॉटेलजवळील एम.व्ही.एल मेडिसिन्थ प्रा.लि. या केमिकल कंपनीला २४ लाख ५९ हजार १५४ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुजरातच्या एकाविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फिर्यादी विनोद संदीपपान चुंगे (वय-४०, रा.अभिषेक नगर, रुबी नगर जवळ, जुळे सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून महेश पटेल (रा.सानद,जि.अहमदाबाद, गुजरात) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, एम.व्ही.एल मेडिसिन्थ या कंपनीमध्ये रबर, कस्मेटिक, औषधे, कृषी कीटकनाशके इत्यादी उद्योगधंद्यासाठी लागणारे कच्चा स्वरूपाचे केमिकल तयार होऊन या कंपनीमधून गुजरात, हैदराबाद, दिल्ली, मुंबई, पुणे या ठिकाणी माल पाठविण्यात येतो. कंपनीचे डायरेक्टर ईशान रेड्डी यांना महेश पटेल या नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्यावेळी महेश पटेल याने आमचे गुजरातेत कंपनी असून, आम्हाला काही केमिक्स उद्योगास लागणार आहे असे सांगून मागणी केली.

    त्यावेळी महेश पटेल याने थोडी रक्कम भरून चेकद्वारे आपला काही पेमेंट माल मिळाल्यानंतर केला जाईल, असे सांगितले. मात्र, कंपनीला दिलेला चेक न वाटल्याने महेश पटेल यांना संपर्क केला असता त्यांनी पैसे देतो, असे म्हणून मोबाइल बंद करून ठेवला. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा महेश पटेल यांना संपर्क साधला असता त्यांचा संपर्क न झाल्याने व मोबाईल बंद ठेवल्याने कंपनीची २६ लाख ५९ हजार १५४ रुपयांची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोल्हाळ हे करीत आहेत.