पाणी पिण्याचा केला बहाणा अन् मोबाईल नेला हिसकावून

    सोलापूर : पाणी पिण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीचा मोबाईल हिसकावून पळवून नेल्याची घटना घडली. ही घटना ३० जून रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मार्केटयार्ड येथील सोलापूर हैदराबाद रोडवर घडली. याप्रकरणी नामदेव व्यंकटराव शिंदे (वय ४२,रा. जळकोट,जिल्हा लातूर) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी नामदेव शिंदे यांचा ट्रक (क्रमांक एम.एच.१२.एल टी ७८३७) हा सोलापुरातून नो एंट्री असल्याने मार्केट यार्ड समोरील सोलापूर-हैदराबाद रस्त्याच्या बाजूला लावून थांबले होते. त्यावेळी अचानक दोघांनी ट्रकच्या दोन्ही बाजूंनी येऊन ड्रायव्हर साईटच्या व्यक्तीने फिर्यादी नामदेव यांना पाणी पिण्यास मागितले. त्यावेळी फिर्यादी नामदेव शिंदे हे पाणी देत असताना अज्ञातांनी फिर्यादीच्या ट्रकच्या केबिनमध्ये चढून फिर्यादीचा हात पकडून बळजबरीने दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून काढून घेऊन पळून गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोसई दाईंगडे हे करित आहेत.