पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या विकास आराखड्याच्या कामाला सुरुवात

सोलापूर: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे(vitthal rukmini temple) मजबूतीकरण आणि संवर्धनासाठी आवश्यक असलेला विकास आराखडा (डीपीआर ) बनवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे . इन्फ्रारेड कॅमेऱ्यांच्या(infrared camera) मदतीने मंदिराचे स्कॅनींग करण्यात येत आहे .कुठे तडे गेले आहेत . पावसाचे पाणी कुठे झिरपते आहे . हे पाहून कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे . याची नेमकी माहिती या आराखड्यामुळे मिळणार आहे .
मंदिराच्या भिंतींना अनेक ठिकाणी तडे गेले असले तरी आवश्यक उपाययोजना पुढील काळात त्या त्यावेळी चांगल्या पध्दतीने केल्या तर अनेक वर्षे मंदिराला कोणताही धोका होणार नाही असा विश्वास या कामासाठी पुरात्तव विभागाच्या माध्यमातून नियुक्त केलेले आर्किटेक्ट प्रदिप देशपांडे (औरंगाबाद ) यांनी व्यक्त केला.
लाखो भाविक वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्राचीन मंदिरांच्या पैकी एक आहे .या मंदिराचा डीपीआर बनवण्याची गरज होती परंतु असा प्लॅन बनवला न गेल्याने गेल्या काही वर्षांपासून त्या त्या वेळचे कार्यकारी अधिकारी आणि मंदिर समितीचे अध्यक्ष यांच्या मनाप्रमाणे मंदिरात दुरुस्ती आणि सुधारणांची कामे केली जात होती. आराखडा बनवण्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते.
दरम्यान मंदिर समितीने देखील आराखडा तयार करण्यास मंजूरी दिली. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी काही महिन्यांच्या पूर्वी श्री विठ्ठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बरोबरच राज्यातील अन्य काही देवस्थानांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी देखील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा आराखडा तयार करण्याविषयी सूचना केल्या होत्या. त्यानंतर पुरात्तव विभागाचे आर्किटेक्ट प्रदिप देशपांडे (औरंगाबाद ) यांची त्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती.

देशपांडे व त्यांच्या तेरा सहकाऱ्यांनी कामाला सुरुवात केली आहे . त्या संदर्भात यापूर्वी तीन, चार वेळा येऊन संबंधितांनी मंदिराची पाहणी केली होती. सर्व्हे केला होता. मंदिराचे आर्किटेक्चर ड्रॉईंग नव्हते.ते तयार केले जात आहे. पुण्यावरुन इन्फ्रारेडची टिम आली असून मंदिराच्या भितींमध्ये कुठे कुठे पाणी मुरत आहे .तडे जाऊ शकतात . दुरुस्तीची कोणकोणती कामे करावी लागतील आणि त्यासाठी अंदाजे किती खर्च येईल याची माहिती तयार केली जाणार आहे .व्हिडिओ शुटींग, ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने चित्रीकरण केले जात आहे . मंदिराच्या डाॅक्युमेंटेशनसाठी त्याचा उपयोग होणार आहे . संपूर्ण मंदिराचे मोजमाप घेऊन त्याच्या नोंदी करण्याचे कामही सुरु करण्यात आले आहे .
ड्रेनेज, इलेक्ट्रीक वायरिंग, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या केबलींगसाठीच्या उपाययोजना नमूद केल्या जातील. सुमारे आठशे ते नऊशे वर्षे जुने मंदिर आहे . मंदिराची देखभाल आणि दुरु्स्ती या पुढील काळात त्या त्या वेळी योग्य पध्दतीने केली गेली तर पुढील शेकडो वर्षे मंदिराला कोणताही धोका होणार नाही. प्राथमिक माहितीनुसार मंदिराला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत .त्यावर कोणत्या पध्दतीने उपाययोजना करता येतील या विषयी आराखड्यात स्पष्टपणे नमूद केेेेले जाणार आहे .
इतिहास संशोधक गोविंद सबनीस यांनी मंदिराचे होणारे ऑडिटचे स्वागत केले असून इन्फ्रारेडमुळे हेमाडपंथी बांधणीतील कमकुवत झालेल्या दगडांची माहिती समजणार असून डागडुजी करून मंदिराचा मुळ ढाचा टिकवण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगितले.
मंदिराची संपूर्ण बांधकाम एकावेळी झाले नसुन काळानुरूप त्यामध्ये भर घालण्यात आली असून पुर्वीच्या वेळी दगडाचा वापर करुन सुसंगत बांधकाम केले असले तरी मंदिर समितीने ही दक्षता न घेतल्यामुळे समस्या निर्माण झाल्यचे भागवताचार्य वा.ना. उत्पात यांनी सांगितले.
विकास आराखडा येत्या दिड महिन्यात तयार होणार आहे.या कामासाठी सुमारे २७ लाख रुपये खर्च होणार आहेत.त्यानंतर पुरातत्व विभागाची मान्यता मिळाल्यावर मंदिर समितीच्या बैठकीत मंजूरी घेऊन आराखडा विधी व न्याय विभागाकडे अंतिम मंजूरी साठी पाठवण्यात येणार आहे .त्यानंतर कामांचा प्राधान्यक्रम ठरवून तातडीने पुढील आवश्यक कामे केली जाणार आहे.