दत्तजयंती असूनही अक्कलकोट शहरात भाविकांना मनाई ; जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जारी केले आदेश

सोलापूर : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दत्तजयंतीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता अक्कलकोटमध्ये भाविकांना प्रवेशास मनाईचे आदेश जारी केले आहेत

सोलापूर : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दत्तजयंतीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता अक्कलकोटमध्ये भाविकांना प्रवेशास मनाईचे आदेश जारी केले आहेत. आदेशात नमूद करण्यात आल्यानुसार, २८ डिसेंबर २०२० च्या रात्री १२ वाजल्यापासून ते ३१ डिसेंबर २०२० च्या रात्री १२ वाजेपर्यंत कोणत्याही भाविक नागरिकांना अक्कलकोट शहर हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती/ संस्था अथवा संघटना भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाईस पात्र असेल. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

स्वामी समर्थ समाधी ठिकाण, स्वामी समर्थ मंदीर आणि अन्नक्षेत्र या तिन्ही ठिकाणी विश्वस्त समिती मोजक्या सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी प्रतिकात्मक स्वरूपात पार पाडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच आज २९ डिसेंबर रोजी होणाऱ्या दत्त जयंतीनिमित्त येणाऱ्या पालख्या, दिंड्या आणि भाविकांना अक्कलकोट शहरात प्रवेश करण्यास मनाई आहे.