…म्हणून मोहोळ नगरपरिषदेसमोर केले धरणे आंदोलन

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मोहोळ शहरातील दत्तनगर भागात राहत असलेल्या डोंबारी समाज, भारतमाता आदिवासी वस्तीगृह, झोपडपट्टी या भागातील रस्ता खराब होऊन येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तो रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा, यासह इतर सोयी सुविधा देण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भोसले यांच्या नेतृत्वाखाली भारतमाता आदिवासी पारधी समाज व भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या वतीने मोहोळ नगरपरिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

    मोहोळ शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये दत्तनगर परिसरात डोंबारी समाज, बहुरूपी समाज गेल्या ४० वर्षांपासून झोपडपट्टीमध्ये राहत आहे. येथील रस्ता अत्यंत खराब असून, येथे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दूषित पाणी जाण्यासाठी गटार नसल्यामुळे दूषित पाणी घरात शिरत आहे. पर्यायाने लहान मुले व वृद्धांना साथीच्या रोगांना तोंड द्यावे लागत आहे. या ठिकाणी असलेल्या ७० ते ८० कुटुंबांना नगरपरिषदेच्या वतीने कोणत्याही सोयी सुविधा देण्यात येत नाहीत. तरी येथील रस्ता तात्काळ दुरुस्त करून येथे पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन द्यावे, डोंबारी वस्तीमधील सर्व कुटुंबासाठी प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भोसले यांच्या नेतृत्वाखाली भारतमाता आदिवासी पारधी समाज व भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

    दरम्यान, या रस्त्याची तांत्रिक मान्यता मिळण्यासाठी पुढील कारवाई केली जाईल. यासह इतर सोयीसुविधासाठी दोन दिवसात पाहणी करून योग्य कार्यवाही करण्याचे पत्र मोहोळ नगरपरिषदेच्या अधिकारी सुवर्णा हाके यांनी दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.

    यावेळी विजया भोसले, कुसुम भोसले, अनुप काळे, जीवा चव्हाण, सुभाष पवार, उत्तम पवार, किसन सितारे, वैशाली चव्हाण, मीनाक्षी पवार, छाया चव्हाण, कांता चव्हाण, शालन चव्हाण, दीपाली चव्हाण आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.