solapur Zp

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जिल्हा परिषद सदस्यांमध्ये खुल्या सभागृहातील सभा रद्द केल्यामुळे असंतोषाचा भडका उडाला आहे. भ्रष्ट कारभारावर जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, सीईओ दिलीप स्वामी यांनी पाठबळ देत पाठराखण करत असल्याचा आरोप करत सदस्यांनी “चले जाओ”चा नारा दिला आहे. कोरोना संसर्गाचे कारण पुढे करीत जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा खुल्या सभागृहात सभा घेण्याची परवानगी फेटाळल्यामूळे जि.प.सदस्यांमध्ये अंसंतोषचा भडका उडाला आहे.

    जिल्हा परिषद सदस्य यांच्या म्हणण्यानुसार जिल्हा नियोजन समिती सभा जिल्हाधिकारी यांनी कोरोना संसर्ग काळात सोयीनुसार घेतली. तेव्हा कोरोना संसर्ग नव्हता का ? पालकमंत्र्याच्या खिदमतीसाठी शेकडोजणांची बैठकीसाठी उपस्थिती असते हे जिल्हाधिकारी यांच्या नजरेस दिसून येत नाही का ? असा सवाल जि.प.सदस्य उपस्थित करित आहेत. जिल्हा परिषदेच्या भ्रष्ट कारभारावर पांघरून घालण्यासाठी खुल्या सभागृहातील सभा टाळण्यात आल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे.

    याबाबत जि.प.सदस्य सचिन देशमुख म्हणाले की, सर्व जि. प. च्या सदस्यांची सर्वसाधारण सभा ऑफलाईन मिटिंग घेण्याची विनंती असताना सोमवारी होणारी सर्वसाधारण सभा जाणीवपूर्वक ऑनलाईन घेण्याचे नियोजन केले आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रश्न मांडता येत नाहीत, तसेच अधिकारी यांनी एकजूटीने सभा होऊ नये म्हणून प्रयत्न केलेले आहेत.

    जिल्हा नियोजन भवनांत सर्व मिटिंग चालतात , मुंबईमध्ये विधान सभेचे अधिवेशन चालते पण आपली मिटिंग चालू शकत नाही याचा अर्थ काय ? आपल्या मिटिंगची परवानगी देण्याचा कलेक्टरला काय अधिकार आहे? आणि आपल्या सभागृहांत मिटिंग घेण्यास अडचण काय ? पण हे जाणीवपूर्वक चालू आहे, असे सर्व सदस्य यांचे मत झाले आहे. तरी आम्ही सर्वजण सोमवारी सकाळी ११ वाजता एकत्र जिल्हा परिषदेत येऊन् ऑनलाइन मिटिंग बंद पाडून ऑफलाईन मिटिंग घेण्यास भाग पाडू अशी संतप्त भावना सचिन देशमूख यांनी व्यक्त केली आहे. सदस्या लक्ष्मी आवटे , अरुण तोडकर ,भारत शिंदे,नितीन नकाते यांनी ऑनलाईन सभेचा निषेध व्यक्त केला आहे.