उद्योजक रामचंद्र पतंगे यांच्या हस्ते मोफत वह्यांचे वाटप

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सोलापूर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समिती सभापती तथा भाजप नेते विजयराज डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील वाघोली व वाघोलीवाडी येथील चारही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना माजी सरपंच तथा उद्योजक रामचंद्र पतंगे यांच्या हस्ते मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हारतुरे अथवा कोणताही उत्सवरूपी कार्यक्रम न करता गरजूंना मदत करण्याचे आवाहन विजयराज डोंगरे यांनी केले होते. तालुक्यातील कर्तव्यदक्ष आणि अभ्यासू नेते म्हणून विजयराज डोंगरे यांची ओळख आहे, सभापती पदाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला पुढे घेऊन जाण्याचे काम ते करत आहेत. सदैव सामाजिक भावना जागृत ठेऊन समाजासाठी काम करणाऱ्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त लोकशक्ती परिवार मोहोळ तालुका व विजयराज डोंगरे मित्र परिवाराच्या वतीने वह्या वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे मत वाघोलीचे युवा ग्रामपंचायत सदस्य विकास वाघमारे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

    दरम्यान, रामचंद्र पतंगे यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच कोंडीबा पाटील व बाबुराव गावडे यांचा कोरोना योद्धे म्हणून सत्कार करण्यात आला.

    यावेळी सरपंच नेताजी वाघमारे, माजी सरपंच गजेंद्र वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य पवन वाघमारे, वसंत हरणे, नितीन पाटील, घोडके, पाटील, गुरवे, सांगवे, खंडागळे, नामदेव वाघमारे आदीसह नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.