झेडपीतील टक्केवारीची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी : उमेश पाटील

- दोन वर्षातील कामाची ग्रामविकास विभागाकडे सादर केली माहिती

    सोलापूर: जिल्हा परिषदेत जिल्हा नियोजनमधून आलेल्या निधीचे वाटप टक्केवारीने केले जात असून, जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली आहे.
    जिल्हा परिषदेत टक्केवारीशिवाय कामे होत नाहीत अशी तक्रार यापूर्वीच सदस्यांनी केली होती. याबाबत चौकशी केल्यावर जलसंधारण, बांधकाम विभागात असे प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सन २०२०-२१ जलसंधारणच्या कामासाठीजलसंधारणच्या कामासाठी दोन महिन्यापूर्वी ३८ कोटीचा निधी आला होता. या निधीचे तालुकानिहाय व सदस्यनिहाय समान वाटप होणे अपेक्षीत होते. पण बरेच सदस्य मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीच्या कामात गुंतल्यावर विभागप्रमुखांनी परस्पर या कामांचे वाटप ठेकेदारांना हाताशी धरून केल्याचा आरोप पाटील यांनी केला. यामध्ये माळशिरस तालुक्यासाठी ९, त्याचप्रमाणे करमाळा, माढा तालुक्याला झुकते माप दिल्याचे निधी वाटपाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. जी कामे दिली गेली ती अधिकाऱ्यांच्या पाहुण्याला वाटप केली आहेत.

    जलसंधारण व इतर विभागाची कामे असमान वाटप होत असल्याची तक्रार यापूर्वीच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांच्याकडे केली होती. त्यांच्याकडे असलेल्या पाच विभागातील कामाबाबत या तक्रारी होत्या. पण या तक्रारीची चौकशी न करता त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या पाच विभागातील दोन वर्षाच्या कामांबाबत यापूर्वीच ग्रामविकास विभागाकडे माहिती सादर केली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनीही या कामांची चौकशी करावी अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली. सदस्यांनासुद्धा टक्केवारी देण्याची झेडपीत वेळ यावी यापेक्षा वेगळे दुर्दैव काय असेल असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

    यापूर्वी झाला होता आरोप
    पहिल्यांदा लक्ष्‍मी आवटे यांनी झेडपीत कामासाठी टक्केवारी मागितली जाते असा आरोप केला होता त्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्ष नेते बळीराम साठे यांनीही तीव्र नापसंती व्यक्त केली होती त्यानंतर आज उमेश पाटील यांनीही टक्केवारीवर लक्षवेधल्यामुळे झेडपीत चर्चेचा विषय झाला आहे.