नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा; सीईओ स्वामी यांच्या सूचना

जिल्ह्यातील ज्या तालुक्यांमध्ये कोविडची रुग्णसंख्या जास्त आहे, अशा तालुक्यांमध्ये कोविड सेवेत अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी नेमण्यासाठी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास तात्काळ सादर करा.

    सोलापूर : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यकारी समिती बैठकीत आज जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात राष्ट्रीय आरोग्य अभियान (ग्रामीण) च्या कार्यकारी समितीची बैठक सीईओ दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सीईओ स्वामी यांनी काही सूचना दिल्या.

    राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत नादुरुस्त रुग्णवाहिका तात्काळ दुरुस्त करण्यात याव्यात जेणेकरून नागरिकांना तत्पर आणि चांगली आरोग्य सेवा मिळेल. प्रत्येक वर्षी आषाढी वारीमध्ये आरोग्यदूत या संकल्पनेंतर्गत मोटरसायकलची रूग्णवाहिका कार्यान्वित केली जाते. त्याच धर्तीवर नॉन कोविड रुग्णांसाठी आरोग्य दूत सुविधा कार्यान्वित केली जावी. रुग्णवाहिका दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास तात्काळ पाठवून द्यावा. रुग्णवाहिकेची सेवा देताना रिस्पॉन्स टाईम कमी व्हावा यादृष्टीने प्रयत्न करावे.

    कोविड-19 संदर्भात उपाययोजनेंतर्गत उपक्रमांची सविस्तर माहिती अथवा प्रशिक्षण गावपातळीवरील कर्मचाऱ्यांना देण्यात यावे जेणेकरून उपक्रमांची परिणामकारकता वाढेल. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जी 34 पदे आहेत ती पदे भरण्यासंदर्भात तसेच वाहन भाडेतत्त्वावर घेण्यासंदर्भात सविस्तर प्रस्ताव तयार करून शासनास सादर करावा. बालकांच्या आरोग्य तपासणीचा वेग वाढविण्यात यावा. SAM व MAM अंतर्गत मोडणाऱ्या बालकांचे सर्वेक्षणास गती देण्यात यावी.

    जिल्ह्यातील ज्या तालुक्यांमध्ये कोविडची रुग्णसंख्या जास्त आहे, अशा तालुक्यांमध्ये कोविड सेवेत अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी नेमण्यासाठी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास तात्काळ सादर करा. कोविड रुग्णसंख्या जास्त असलेल्या तालुक्यांमध्ये कडक निर्बंध लावण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा. कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या शाळांसह खाजगी शाळांमधील 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी मोहीम सुरू करा.

    यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. इरफान सय्यद, जिल्हा आयुष अधिकारी डॉ विलास सरवदे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. दळवी, जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमतील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.