जलसंपदा अंतर्गत जिल्ह्यातील उजनी प्रकल्पाची कार्यालये व आस्थापना बंद करु नका : दिलीपराव माने

    सोलापूर : उजनी प्रकल्पाची ३१६४ कोटींची कामे भीमा कालवा मंडळाकडे असून, त्या कामाचे समान वितरीत करुन उपलब्ध कर्मचाऱ्यांमध्ये काम केल्यास १-१६ लाख हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार असल्याने केवळ कार्यालयाकडे कामे नाहीत व अपुरा कर्मचारी वर्ग कारण सांगून उजनी प्रकल्पाची कार्यालये व आस्थापना बंद करु नयेत, अशी मागणी माजी आमदार दिलीपराव माने यांनी भीमा कालवा मंडळाचे अधिक्षक अभियंता जयंत शिंदे यांना भेटून केली.

    जलसंपदा विभागाची सोलापूर जिल्ह्यातील उजनी प्रकल्पाची महत्वाची कार्यालये व आस्थापना बंद करण्याचे प्रस्तावित असल्याने माने यांनी सदरची कार्यालय बंद करु नयेत, अशी मागणी केली. सोलापूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प बांधकाम व व्यवस्थापन यासाठी दोन स्वतंत्र मंडळ कार्यालय आहेत. मात्र, दोन्ही मंडळामधील भीमा कालवा मंडळ व त्याचे एक विभागीय कार्यालयासह ७ उपविभाग या कार्यालयाकडे कामे नसल्यामुळे व ५० टक्के कर्मचारी असल्यामुळे इतर जिल्ह्याच्या धर्तीवर सोलापूर जिल्ह्यातील अधिक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण व अधिक्षक अभियंता भीमा कालवा मंडळ, सोलापूर या दोन्ही मंडळ कार्यालयाचे एकत्रिकरण प्रस्ताव महामंडळाने शासनाकडे प्रस्तावित केला.

    प्रत्यक्षात उजनी प्रकल्पाची उर्वरीत ३१६४ कोटींची कामे भीमा मंडळाकडे आहेत. त्या कामाचे फेरवाटप सर्व कार्यालयास समान वितरीत केल्यास उपलब्ध कर्मचाऱ्यांमधून या जिल्ह्यातील १.१६ लाख क्षेत्र सिंचनाखाली येण्यास गती मिळणार आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील विषेशतः दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट या दुष्काळग्रस्त तालुक्यातील शिरापूर,एकरुख या योजनेची कामे पूर्ण करुन या भागातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळवू देणे गरजेचे आहे. केवळ कामे नाहीत म्हणून उजनी प्रकल्पाची कार्यालय व आस्थापना बंद करण्याचा निर्णय योग्य ठरणार नसल्याचे माने यांनी सांगितले.

    यावेळी बाबासाहेब पाटील, सुनील भोसले, कमलाकर भोसले, विलास आदलिंगे, महादेव खारे, ऍड. अजित पाटील, नितीन भोसले आदी उपस्थित होते.

    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

    जिल्ह्यातील उजनी प्रकल्पाची महत्त्वाची कार्यालये व आस्थापना बंद करु नये. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांना मी पत्रव्यवहार केला असून, ही कार्यालय बंद करु नये यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे माने यांनी सांगितले.