jayant patil

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : राज्यात सध्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीवरून ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांची डोकेदुखी झाली आहे. जयंत पाटील यांच्यावरही ईडीच्या डोळा आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर होते. तसेच ईडी चंद्रकांतदादांच्या सल्ल्याने वागते, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

    जयंत पाटील यांना पत्रकार परिषदेत ईडीच्या चौकशीवरून प्रश्न विचारण्यात आला. ईडी ही भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सल्ल्यानुसार वागते हे अनेक प्रकरणावरून सिद्ध झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्याला आता ज्ञात झाले आहे की, राज्यातील सरकार पाडण्यासाठी जे काही शक्य आहे ते भाजप करत आहे. त्यासाठी ईडी आणि सीबीआय या संस्था आमच्या राज्यातील विरोधी पक्षाची सल्लामसलत करून कार्यवाही करतात, असा थेट आरोप जयंत पाटील यांनी सोलापुरात केला.

    एमआयएम मुस्लिम आरएसएस पार्टी

    जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एमआयएमच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रवेश करतेवेळी एमआयएमच्या विचारसरणीवर खडेबोल सुनावण्यात आले. मात्र, एमआयएमच्या नगरसेवकाने अद्याप प्रवेश राष्ट्रवादीत केला नाही. एमआयएम ही मुस्लिम आरएसएस पार्टी असल्याचा राष्ट्रवादी अल्पसंख्याक अध्यक्ष महिबूब पठाण यांनी आरोप केला आहे.

    सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा तसेच एमआयएम पक्षातून कार्यकर्त्यांचा प्रवेश कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष वसीम पठाण यांनी एमआयएम पक्षावर जोरदार टीका केली. नांदेडमध्ये आम्ही एमआयएम पक्षाचे डिपॉझिट जप्त केले. कारण ही पार्टी मुस्लिम आरएसएस पार्टी असल्याचा आरोप केला. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय मामा शिंदे, आमदार यशवंत माने, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष जाधव यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.