वृद्ध दाम्पत्याची विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

अज्ञात कारणाने वृद्ध दाम्पत्याने विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या (Suicide in Mohol) केल्याची घटना शुक्रवारी (दि.८) मोहोळ तालुक्यातील खंडाळी गावात उघडकीस आली.

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : अज्ञात कारणाने वृद्ध दाम्पत्याने विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या (Suicide in Mohol) केल्याची घटना शुक्रवारी (दि.८) मोहोळ तालुक्यातील खंडाळी गावात उघडकीस आली. पोपट बाबूराव मुळे (वय ६५ वर्षे, कमल पोपट मुळे वय ५६ वर्षे (दोघे रा. खंडाळी ता. मोहोळ) अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे.

    याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पोपट बाबूराव मुळे, कमल पोपट मुळे हे पती पत्नी गुरुवारी ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात कारणाने घरातून निघून गेले होते. त्यामुळे त्यांचा मुलगा अमर मुळे व चुलत भाऊ बाळू मुळे यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, ते कठेच मिळूून आले नाहीत. दरम्यान, शुक्रवारी सकाळी हे दोघे पती-पत्नी शेतातील टोमॅटोच्या पिकाशेजारी असणाऱ्या लिंबाच्या झाडाखाली झोपलेल्या अवस्थेत दिसले. त्यामुळे त्यांना जवळ जाऊन पाहिले असता, त्यांच्या तोंडाला फेस येऊन ते दोघे मृत झाले होते. घटनास्थळी कसल्यातरी कीटकनाशकाचा उग्र वास येत असल्याने त्या दोघांनी अज्ञात कारणाने घरातून निघून जाऊन आत्महत्या केल्याची नातेवाईकांची खात्री पटली.

    या प्रकरणी बाळू केरू मुळे यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक चंद्रकांत आदलिंगे हे करीत आहेत. मात्र, या वृद्ध दाम्पत्याने नेमक्या कोणत्या कारणाने विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली, हे अद्याप समजू शकले नाही. त्यामुळे या आत्महत्या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे खंडाळी सह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.