Elderly parents in a bullock cart to Pandharpur Wari; Nanasaheb Patole was also overwhelmed to see modern day Shravan bal

मुंबई : वृद्ध आईवडिलांचा त्रास नको म्हणून त्यांना आळंदीला सोडून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोघा सख्ख्या भावांचा अनुभव आळंदीकरांनी नुकताच अनुभवला. त्याच आळंदीत वयाची पन्नाशी पार केलेले दोघे सख्खे भाऊ कसलीही चिंता न करता वयोवृद्ध आईवडिलांना आळंदी ते पंढरपूर अशी वारी स्वतःला बैलगाडीला जोतून करत आहेत.

हे दृष्य पाहून विधानसभेचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनाही गहिवरून आले. आधुनिक काळातील या दोघा श्रावण बाळांच्या आईवडीलाप्रति असलेल्या भक्तीला नानासाहेबांनी वंदन करत त्यांना सर्वोतोपरी सहाय्य करण्याचा शब्द दिला.

विधानसभेचे अध्यक्ष नानासाहेब पटोले दोन दिवसांच्या पंढरपूर, आळंदी दौऱ्यावर होते. पंढरपूर येथील कार्यक्रम आटपून नानासाहेब टेम्भुर्णी मार्गे आळंदीला येत होते. वाटेत मध्येच दोन माणसे बैलगाडीसदृश्य गाडी खेचत वृद्ध जोडप्याला घेऊन जात असलेले त्यांनी पाहिले. कुतुहुल म्हणून नानासाहेबांनी त्यांना थांबवले आणि चौकशी केल्यावर त्यांना या श्रावण बाळांची कथा समजली.

९० वर्षीय ज्ञानदेव कोंडीबा काळे आणि ७५ वर्षीय जनाबाई काळे हे आळंदीत रहाणारे वारकरी दांपत्य. शेतकरी असलेल्या या दांपत्याने उमेदीच्या काळात विठुरायाच्या प्रति असलेली आपली भक्ती जोपासली. वाढत्या वयानुसार पुढे काळे दांपत्याला प्रवासाचा त्रास होऊ लागला. वारीत खंड पडणार म्हणून आपल्या आईवडिलांची होणारी घालमेल पाहून त्यांना पंढरपूरची वारी नियमितपणे घडवून आणण्याचा वसा ५५ वर्षीय तानाजी आणि ५० वर्षी बाळू काळे यांनी उचलला आणि गेली काही वर्षांपासून त्यांनी कायमही ठेवला.

आपले कुटूंब, व्यवसाय यापासून काही दिवस सुट्टी घेऊन मागील काही वर्षात या दोघा भावांनी तब्बल तीनशे हुन अधिक वेळा आई वडिलांना आळंदी ते पंढरपूर अशी वारी घडवून आणली. पैसा, इतर साधन सामुग्री असो की नसो ज्ञानेश्वर माऊली आणि विठुरायाच ही सेवा आमच्याकडून करवून घेत आहे त्यामुळे शेवटपर्यत त्यात खंड पडू देणार नाही असे या दोघा भावांनी सांगितले.

त्यांच्या या भक्तीला पाहून नानासाहेब यांनी काळे बंधूंना पुढील प्रवासासाठी छोटी आर्थिक मदत देऊ केली. याशिवाय नानासाहेबांनी संपर्क साधण्यासाठी स्वतःचे दूरध्वनी क्रमांक देत त्यांना मदत करण्याचे वचन दिले. यावेळेस नानाभाऊ बरोबर पुण्याचे उद्योगपती अनिल झोडगे व कल्याणचे क्रीडासंघटक अविनाश ओंबासे होते.