पंढरपूरमधील मतमोजणीसाठी प्रशासन झाले दक्ष, मतमोजणी केंद्रावरील कर्मचाऱ्यांसाठी ‘या’ गोष्टी बंधनकारक

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक(Pandharpur Election) मतमोजणी २ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होत आहे. या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई कीट बंधनकारक(rules for election vote counting करण्यात आले आहेत.

    पंढरपूर: पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक(Pandharpur Election) मतमोजणी २ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होत आहे. या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई कीट बंधनकारक करण्यात आले आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची संख्या कमी केल्याने निकाल येण्यास जास्त वेळ लागू शकतो, असे निवडणूक निर्णय अधिकारी व मतदान केंद्राचे प्रमुख गजानन गुरव यांनी स्पष्ट केले आहे.

    आज २ मे रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून एकूण १६० कर्मचारी या मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. यातील ७० कर्मचारी मतमोजणी करतील, तर इतर कर्मचारी राखीव ठेवले जातील. सकाळी साडे सात वाजल्यापासून तीन टेबलवर टपाली मतमोजणी होईल. तर आठ वाजल्यापासून एकूण १४ टेबलवर मतमोजणीला सुरुवात होईल. ५२४ मतदान केंद्रांमधून आलेल्या मतपेट्या ३८ फेऱ्यामधून मोजल्या जातील. मतदार केंद्रामध्ये प्रवेश करताना प्रत्येक कर्मचारी व उमेदवारांचे प्रतिनिधी यांना पीपीई कीट धारण करावे लागेल.

    मतदान केंद्रांमध्ये येणाऱ्या कोणत्याही कर्मचारी किंवा प्रतिनिधी यांना मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर प्रवेशद्वारावर पोलीस प्रशासन प्रवेशकर्त्यांना मावा, गुटखा, तंबाखू आदी गोष्टी नेण्यास मज्जाव करतील. मतदान केंद्रांमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कर्मचारी किंवा प्रतिनिधी यांना २ लस घेतल्याचे प्रमाणपत्र अथवा कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागेल.

    मतमोजणीबाबत अधिक माहिती देताना मतमोजणी केंद्र अधिकारी गुरव म्हणाले की, यंदा प्रथमच कोरोना प्रसार वाढत असल्याने दक्षता घेऊन मतमोजणी केंद्राची रचना करण्यात आली आहे. यावेळी मतमोजणी बंदिस्त न जागेत होता, उघड्या जागेवर होईल. प्रत्येक टेबलमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात आले आहे. तसेच कर्मचाऱ्यांजवळ कोणाची गर्दी होऊ नये, म्हणून मतमोजणी प्रतिनिधींना देखील लांब अंतरावर उभे करण्यात येणार आहेत. मतमोजणीनंतर निकाल येण्यास किमान सायंकाळचे सात वाजेपर्यंत वेळ लागू शकतो. मतमोजणी आकडेवारी सोशल मीडिया तसेच रेडिओ व निवडणूक आयोगाच्या ॲपवरून प्रत्येक फेरीनंतर जाहीर करण्यात येईल.