शिवसेनेच्या इशाऱ्यानंतरही राष्ट्रवादीची फोडफोडी सुरूच; शिवसेनेची ताकद वाढवणारा नेता अजित पवारांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादीत प्रवेश

सोलापूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नगरसेवक महेश कोठे हे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामुळे आता या सगळ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कशाप्रकारे व्यक्त होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नगरसेवक महेश कोठे हे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामुळे आता या सगळ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कशाप्रकारे व्यक्त होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी अहमदनगरच्या पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी शिवसेनेचे नगरसेवक फोडले होते. तेव्हा देखील अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला होता. तेव्हा उद्धव ठाकरे प्रचंड संतापले होते.

यानंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडून अजित पवार यांना फोन करून निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता. सत्तेतील मित्रपक्ष एकमेकांचे लोकप्रतिनिधी फोडायला लागले, तर योग्य संदेश जाणार नाही. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक परत शिवसेनेत पाठवावेत, असा निरोप उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांना धाडला होता. अखेर या बंडखोर नगरसेवकांनी ‘मातोश्री’वर येऊन हातात पुन्हा शिवबंधन बांधले होते.

मात्र, सोलापुरात महेश कोठे बऱ्याच दिवसांपासून नाराज असल्याने तडजोड होण्याची शक्यता कमी आहे. आपल्या नेतृत्वाखाली सोलापुरात शिवसेनेची ताकद वाढली. मात्र, विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी पत्ता कट झाल्यामुळे कोठे नाराज होते. त्यामुळे त्यांनी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीत जायचे असा निर्धार केला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे महेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.