गुन्हे दाखल झाले तरी दुकाने उघडणारच ; पंढरीत आज व्यापारी विरुद्ध प्रशासन संघर्ष

व्यापारी व त्यांच्या कर्मचार्‍यांनी कोरोना विषयक तपासणी करून घेणे बंधनकारक केल्यामुळे सर्व व्यापारी व कर्मचाऱ्यांनी या नियमाची पूर्तता केली आहे. मात्र अचानक आदेश काढून सर्व व्यापार व्यवस्था ठप्प करण्याचे धोरण शासनाने जाहीर केल्याने व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड संतोष पसरला आहे.

    पंढरपूर : शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी केल्यानंतर, आता गुन्हे दाखल झाले तरी हरकत नाही, पण उद्या आपण दुकाने उघडणारच, असा आक्रमक पवित्रा पंढरीतील व्यापारी महासंघाने घेतला आहे. यामुळे पंढरपुरात आज दि.७ रोजी प्रशासन विरूध्द व्यापारी असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

    कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून राज्य शासनाने अचानकपणे कोणतीही पूर्वसूचना न देता लॉक डाऊन सदृश्य परिस्थिती जाहीर करून व्यापारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे पंढरपुरातील व्यापारी वर्ग संतप्त झाला आहे. या निर्णयावर नाराजी करत व्यापारी महासंघाने महासंघाचे अध्यक्ष भट्टड यांच्या निवासस्थानी घेतलेल्या बैठकीत या निर्णयाला विरोध करण्याचे धोरण ठरवण्यात आले. व्यापारी महासंघाची बैठक सुरू असतानाच आपली प्रचारसभा सोडून आ.परिचारक व इतर भाजपाची मंडळी बैठकी पोहोचली. त्यांनी व्यापाऱ्यांच्या भावना राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या कनावर घातल्या. यावेळी फडणवीस यांनी व्यापाऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन दिले.

    मात्र व्यापाऱ्यांनी यानंतर देखील उद्या दिनांक ७ रोजी आपली दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचा आदेश झुगारून कोणतेही गुन्हे दाखल झाले तरी हरकत नाही, परंतु आपण आपली दुकाने उघडणार यावर व्यापारी ठाम आहेत.

    पंढरपूर शहराची अर्थव्यवस्था ही वर्षातून चार वेळा भरणाऱ्या चार प्रमुख यात्रांवर आहे. मात्र गेल्या वर्षभरात कोणतीही यात्रा न भरल्याने व्यापारी प्रासादिक उत्पादक यांची आर्थिक कोंडी झालेली आहे. यामुळे व्यापारी वर्गात प्रचंड नाराजी निर्माण झालेली आहे.

    व्यापारी व त्यांच्या कर्मचार्‍यांनी कोरोना विषयक तपासणी करून घेणे बंधनकारक केल्यामुळे सर्व व्यापारी व कर्मचाऱ्यांनी या नियमाची पूर्तता केली आहे. मात्र अचानक आदेश काढून सर्व व्यापार व्यवस्था ठप्प करण्याचे धोरण शासनाने जाहीर केल्याने व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड संतोष पसरला आहे. व्यापारी व प्रशासनातील या संघर्षाला नेमके काय वळण लागते, हे आज स्पष्ट होईल.