प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संवेदना जागृत ठेऊन काम करावे : दिलीप स्वामी

    सोलापूर : आरोग्य व शिक्षण हे विभाग अतिशय महत्त्वाचे आहेत. या विभागाच्या कामाकडे दुर्लक्ष केले तर भावी पिढीला त्याचे परिणाम भोगावे लागतील म्हणून प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्यामधील संवेदना जागृत ठेवून काम करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

    जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये पंचायत समिती, उत्तर व दक्षिण सोलापूरच्या आयोजित करण्यात आलेल्या सर्व विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीमध्ये दिलीप स्वामी हे बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) परमेश्वर राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत ) चंचल पाटील , मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार , महिला व बाल कल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख , ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अधिकारी सुनिल कटकधोंड , पंचायत समिती दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी राहूल देसाई , पं.स.उत्तर सोलापूरच्या गटविकास अधिकारी डॉ.जस्मिन शेख आदी उपस्थित होते.

    यावेळी स्वामी म्हणाले , ग्रामीण भागात जिल्हा परिषद अंतर्गत शासनाच्या विविध योजना राबविताना विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी समन्वय व असंवेदना जागृत ठेवून काम करणे गरजेचे आहे. आज कोरोनाची परिस्थिती कमी होत असताना शिक्षण, आरोग्य , पाणी पुरवठा , स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन, रोजगार हमी योजना , ग्रामीण जीवन्नोती अभियान ,लघु पाटबंधारे , ग्रामपंचायत, महिला व बाल कल्याण आदी विभागाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. या योजनेमध्ये प्रगती कमी असल्याने त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

    या योजनांचे काम येत्या पंधरा दिवसांत प्रगतीपथावर असले पाहिजे. अन्यथा संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई करण्याची सुचनाही दिलीप स्वामी यांनी केली. यावेळी परमेश्वर राऊत यांनी ग्रामीण भागात ग्रामस्थांच्या आरोग्याशी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन हे निगडीत असल्याने सदरची कामे प्राधान्याने पूर्ण करणे गरजेचे असल्याचे सांगितले.