तुम्हाला हे ठाऊक आहे का? आता शहरात येण्यापूर्वीच चेकपोस्टवर होणार कोरोना टेस्ट

पंढरपूर, मोहोळ, माढा, माळशिरस या तालुक्‍यांमध्ये रुग्णवाढ मोठी आहे. या तालुक्‍यातील बरेच लोक विविध कामांसाठी शहरात दररोज ये- जा करतात. त्यांची तपासणी आता बाळे येथील नाकाबंदी पॉइंटवर तर अक्‍कलकोटहून येणाऱ्यांची तपासणी अक्‍कलकोट रोडवरील नाकाबंदी पॉइंटवर केली जाणार आहे.

  सोलापूर : कोरोनाची दुसरी लाट थोपवून लावण्याच्या दृष्टीने राज्यात १ मेच्या सकाळी सातपर्यंत कडक संचारबंदी करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरात येणाऱ्या प्रत्येकाची (ज्यांच्याकडे मागील ४८ तासांत टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र नाही) नाकाबंदीच्या ठिकाणी कोरोनाची रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जाणार आहे; जेणेकरून पॉझिटिव्ह रुग्णांचे लवकर निदान शक्‍य होईल, असा त्यामागचा हेतू आहे.

  पंढरपूर, मोहोळ, माढा, माळशिरस या तालुक्‍यांमध्ये रुग्णवाढ मोठी आहे. या तालुक्‍यातील बरेच लोक विविध कामांसाठी शहरात दररोज ये- जा करतात. त्यांची तपासणी आता बाळे येथील नाकाबंदी पॉइंटवर तर अक्‍कलकोटहून येणाऱ्यांची तपासणी अक्‍कलकोट रोडवरील नाकाबंदी पॉइंटवर केली जाणार आहे. विजयपूरहून येणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी विजयपूर रोडवर एक स्वतंत्र नाकाबंदी पॉइंट तयार करण्यात आला आहे. तर हैदराबादहून येणाऱ्यांच्या तपासणीसाठीही त्या रस्त्यावर शहर हद्दीत नाकाबंदी लावण्यात आली आहे.

  या नाकाबंदी ठिकाणांपैकी काही ठिकाणी येतानाही आणि जातानाही तपासणी केली जाणार आहे. त्यांच्या प्रवासाचे कारण रास्त आहे का, त्यासाठी संबंधितांनी परवानगी घेतली आहे का, याचीही पोलिस पडताळणी करणार आहेत. दरम्यान, शहराच्या तुलनेत आता ग्रामीण भागातील रुग्णवाढ मोठी असून मृत्यूही वाढू लागले आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, कोणालाही जीव गमवावा लागू नये म्हणून पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे.

  शहरात येणाऱ्या प्रत्येकाची नाकाबंदीच्या ठिकाणीच कोरोना टेस्ट करण्याचे नियोजन केले आहे. विजयपूर रोड, हैदराबाद रोड, पुणे रोड आणि अक्‍कलकोट रोड या चार ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. तुळजापूर येथे नाकाबंदी असल्याने तुळजापूर नाक्‍यावर नाकाबंदी लावलेली नाही.

  – अंकुश शिंदे, पोलिस आयुक्‍त, सोलापूर

  बार्शीवरून येणाऱ्यांवर नाही वॉच

  बार्शी तालुक्‍यात दररोज सरासरी दोनशेहून अधिक रुग्ण आढळत आहेत. बार्शीवरून दररोज अनेकजण शहरात विविध कामानिमित्त येतात. कडक संचारबंदी काळात बाळे परिसरात शहर पोलिसांनी नाकाबंदी पॉईंट लावला आहे. मात्र, बाळे येथून थेट शहरात एंट्री करणे सोयीचे असल्याने आणि जुना पुना नाका येथून शहरात प्रवेश करतानाही कोणीच हटकत नाही. त्यामुळे अनेकजण शहरात येत असल्याची स्थिती आहे. त्यावर देखील नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्‍त होत आहे.