नियमित कर्जदारांना अपेक्षा प्रोत्साहनपर अनुदानाची; ७२ हजार शेतकऱ्यांना मिळाला ६४२ कोटींचा लाभ

    सोलापूर / प्रतिनिधी : निवडणुकीच्या धामधुमीत दिलेला शब्द महाविकास आघाडी सरकारने पाळला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना अमलात आणली. पहिल्या टप्प्यात या योजनेची अंमलबजावणीदेखील प्रभावीपणे करण्यात आली. परंतु नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही प्रोत्साहनपर अनुदान देण्याबाबतीत राज्य सरकारकडून कोणत्याच हालचाली दिसून येत नाहीत.

    राज्यातील दोन लाख रुपयांपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यात येईल आणि नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ दिला. या योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख रुपयांपर्यंतचे थकबाकीदार असलेल्या ७२ लाख १२० शेतकऱ्यांना तब्बल ६४२ कोटी बारा लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे. दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी व नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्याबाबतीत राज्य सरकारने अद्याप कोणताही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही.

    मार्च महिन्यापासून राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत गेला. त्यामुळे कर्जमुक्ती योजनेचे काम थांबले होते. आता कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात सरकारला यश मिळत आहे. त्यामुळे कर्जमुक्ती योजना सरकारने पुन्हा राबवावी, अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी राज्य सरकारने मंत्रिगटाची उपसमिती नेमली आहे. परंतु प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्या बाबतीत अद्याप सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

    तत्कालीन युती सरकारने दीड लाख रुपयांपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवली. या योजनेतून दीड लाखांवरील थकबाकीदारांसाठी एकरकमी परतफेड योजना आणि नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २५ हजारांचे अनुदान दिले. दीड लाखापर्यंत थकबाकीदार असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील ७३ हजार ४९४ शेतकऱ्यांना ५११ कोटी ६१ लाख रुपयांची कर्जमाफी तत्कालीन युती सरकारच्या काळात मिळाली. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या ४८ हजार ३९९ शेतकऱ्यांना १०६ कोटी २० लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळाले होते.