‘नापास’ सीईओंचा शिक्षकांकडून होणार सन्मान; सोलापूर जिल्हा परिषद गुणांकनात मागे

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्हा परिषद सीईओ दिलीप स्वामी हे नापास झाले आहेत. बोगस दिव्यांग शिक्षकांवर होणारी कारवाई टाळण्यासाठी ५ स्पटेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त अभिनव प्रशासक या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.

    बोगस कागदपत्रे जोडून दिव्यांगाचा लाभ घेतल्याचा आहवाल चौकशी समितीने यापूर्वीच दिला होता. संभाव्य प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी शिक्षकसंघटनेकडून पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असल्याची चर्चा जोर धरली आहे. प्रधानमंत्री आवास याेजनेतील सोलापूर जिल्हा परिषदेचे काम मागे पडले आहे. पुणे विभागात जिल्हा परिषदेला एकही पुरस्कार मिळालेला नाही.

    पुणे विभागीय आयुक्तांनी सोमवारी कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्हा परिषदेला महाआवास अभियान ग्रामीणचे विभागीय पुरस्काराचे वाटप केले. यात साेलापूर जिल्हा परिषदेला एकही पुरस्कार मिळालेला नाही. सर्वोत्कृष्ट जिल्हे, तालुका व ग्रामपंचायतीचे पुरस्कार इतर जिल्ह्याला मिळाले. विशेष म्हणजे शासकीय जागा व वाळू उपलब्धतेचे पुरस्कार पटकावता आलेले नाहीत. सोलापूर जिल्हा परिषद आवास योजनेत आत्तापर्यंत अव्वल राहिली आहे; पण पहिल्यावेळेस सोलापूर जिल्हा परिषदेचे कोठेच नाव न आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

    प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ग्रामीणमध्ये ३६ हजार २५६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. यातील २१ हजार ६१८ घरकुले पूर्ण झाली आहेत. उर्वरित ३४ हजार ८१० घरकुलांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. यामध्ये राज्य पुरस्कृत याेजनेंतर्गत १५ हजार २४८ घरकुले मंजूर आहेत. त्यातील ११ हजार ८०१ घरकुले पूर्ण झाली आहेत, तर उर्वरित १४ हजार ८२० लाभार्थींना पहिला हप्ता देण्यात आला आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेंतर्गत जागा खरेदीसाठी १६१ जणांना लाभ देण्यात आला आहे.

    महाआवास अभियानांतर्गत नावीन्यपूर्ण घरकुलबांधणीचे काम सुरू झाले आहे. यासाठी १० तालुक्यांत डेमोहाऊस तयार करण्यात येत आहेत. यातील दोन डेमोहाऊस पूर्ण झाले आहेत. घरकुल योजनेतील घरांना वीज, नळ, उज्ज्वला गॅस कनेक्शन व लाभार्थींना ग्रामीण जीवन्नोनती अभियानांतर्गत उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे असतानाही चालू वर्षातील कामगिरीत सोलापूर जिल्हा मागे पडल्याचे दिसून येत आहे.