नदीच्या बंधाऱ्यावरून जाताना पाय घसरून पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

  मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जनावरांना चारा, वैरण, पाणी करण्यासाठी भोगावती नदीच्या बंधाऱ्यावरून जात असताना पाय घसरून पाण्यात पडून एक शेतकरी मृत्युमुखी पडला. ही घटना गुरुवारी (दि.७) सकाळी साडे आठ वाजण्याच्या दरम्यान मोहोळ तालुक्यातील देगाव (वा) गावच्या हद्दीत घडली.

  याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देगाव वाळूज येथील विनायक कृष्णा आतकरे (वय ५०) हे त्या ठिकाणी कुटुंबासह राहतात. शेतीवर अवलंबून उदरनिर्वाह करून ते आपल्या कुटुंबाची उपजीविका करतात. गावात असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून त्यांच्या शेताला ये जा करण्या करिता रस्ता आहे. गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसाने भोगावती नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. गेल्या वर्षीही पावसाळ्यात पूर आल्यामुळे पश्चिम दिशेने बंधाऱ्याचा भाग फुटल्याने सर्व शेतकरी हे पलीकडे जाण्यासाठी नदीच्या पात्रातूनच ये-जा करत होते.

  ७ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे आठ वाजण्याच्या दरम्यान विनायक आतकरे हे जनावरांना वैरण पाणी करण्यासाठी बंधाऱ्यावरून वाहत असलेल्या पाण्यातून नदीच्या पात्रातुन पलीकडे जात असताना त्यांचा पाय घसरून ते पाण्यात पडले. त्यावेळी पाण्यात पडून वाहत्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. इतर शेतकऱ्यांनी व गावातील लोकांनी बंधाऱ्याजवळ विनायक आतकरे यांचा मृतदेह वाहून जात असताना बाहेर काढला. याप्रकरणी परमेश्वर नागनाथ आतकरे यांनी मोहोळ पोलिसात खबर दिली असून, त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

  यापूर्वीही दोन ते तीन वेळा नदीला पूर आला होता. त्यावेळी संबंधित विभागाने तात्पुरत्या उपाययोजना करत मुरूम टाकला होता. तो टाकलेला मुरूम वाहून जातो. त्यामुळे नदीच्या पलीकडील शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी अडचण निर्माण होते. आमच्या चुलत्याचा मृत्यू हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाला असून, यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून ही आम्हाला दाद मिळत नाही. त्यामुळे ही घटना घडली.

  – आप्पासाहेब आतकरे, विनायक यांचे नातेवाईक, देगाव वाळूज, ता. मोहोळ.

  भोगावती नदीवरील देगाव वाळूज येथील बंधारा मागील वर्षी पडलेला आहे त्याबाबत टेंडर निघालेले होते. परंतु काही त्रुटी असल्याने ते टेंडर रखडले होते. आता नव्याने टेंडर बनविले असून, येत्या पंधरवड्यात त्या बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात करणार आहोत.

  – एम. टी. जाधवर, कार्यकारी अभियंता, सोलापूर पाटबंधारे विभाग, सोलापूर