अनुभवांनी शिकणारा शेतकरी हा शास्त्रज्ञच : अनिरुद्ध कांबळे

  सोलापूर :  कृषी दिनाच्या निमित्ताने सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कृषी सभापती अनिल मोटे, महिला बालकल्याण सभापती स्वाती शटगार,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, पक्षनेते अण्णाराव बाराचारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, आत्माचे प्रकल्प संचालक मदर मुकणे, कृषी विकास अधिकारी नंदकुमार पाचकुडवे, मृदू शास्त्रज्ञ बी एस कदम, इंडोफिल इंडस्ट्रीजचे विभागीय व्यवस्थापक निशांत माने आदी उपस्थित होते. यावेळी रब्बी पीक स्पर्धेतील विभागीय व जिल्हा स्तरावर पुरस्कार विजेते शेतकऱ्यांचा रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.

  शेतकऱ्यांना मार्गदर्शनापेक्षा पाठबळाची आज जास्त गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. एक जुलै रोजी दोन राष्ट्रीय दिन साजरे केले जातात डॉक्टर्स डे व कृषी दिन. कोरोनाच्या कठीण प्रसंगात दवाखान्यात डॉक्टर लोकांचे जीव वाचण्यात व्यस्त आहेत व शेताच्या बांधावर शेतकरी अवघ्या समाजाचा अन्नदाता बनून उभा आहे. शेतकरी व डॉक्टरांनी या कठीण काळात समाजासाठी फार मोठे योगदान दिले आहे व देत आहेत.

  याप्रसंगी सीईओ स्वामी म्हणाले, शेतकऱ्यांना शेती कशी करावी, याबाबत मार्गदर्शनापेक्षा कृषी विषयक सर्व योजनांची माहिती देण्याची गरज आहे. शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या योजना आहेत. या योजनांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन देण्याची आवश्यकता आहे. कृषी अधिकारी त्यांच्या कर्मचार्‍यांनी शेतकऱ्यांना सर्व योजनांची सविस्तर व अद्ययावत माहिती द्यावी असे आवाहन दिलीप स्वामी यांनी याप्रसंगी केले.

  प्रगत शेती करण्याबरोबरच शेतकऱ्यांनी जलसंवर्धनाकडे अधिक लक्ष देण्याची आज गरज आहे तसेच शेतकऱ्यांनी छतावरचे पाणी जमिनीत मुरवणे व विहीर पुनर्भरण या बाबींकडे लक्ष द्यावे असे अर्जुन गुंडे यांनी सांगितले.

  याप्रसंगी अधिक शेती उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती असणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्याचप्रमाणे प्रधानमंत्री फळ पीक विमा योजना प्रचार व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विकास अधिकारी नंदकुमार पाचकुडवे यांनी केले तर सूत्रसंचालन कल्याण श्रावस्ती व आभार आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे यांनी मानले.