भाेयरेतील ग्रामसेवकावर लाचलुचपतचा गुन्हा दाखल

    मोहोळ : तालुक्यातील भोयरे येथे दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या रोजगार हमी योजनेतून पूर्ण करण्यात आलेल्या विहीरीचे हजेरी पुस्तक पंचायत समिती कार्यालयात सादर केल्यानंतर येथील ग्रामसेवक मंगेश बारगळ याने तक्रारदाराकडून प्रत्येकी दोन हजार प्रमाणे ६ हजार रु घेतले होते. त्यांनतर पुन्हा ७ हजार पाचशे रुपयांची मागणी केल्याने वैतागलेल्या लाभार्थ्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार केली होती. त्यानुसार लांबोटी येथे सापळा ही लावण्यात आला होता मात्र ग्रामसेवक बारगळ याला कुणकुण लागताच त्याने तेथून पळ काढला होता याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार त्या ग्रामसेवकाच्या विरोधात २ जुलै रोजी मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोयरे येथील तीन शेतकऱ्यांच्या शेतात महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत दोन वर्षापूर्वी विहीर मंजूर झाली होती. सदर विहिरीचे कामकाज टप्प्याटप्प्याने करण्यात आले, त्या विहिरीच्या कामकाजाच्या बिला बाबतचा अहवाल तयार करून तो हजेरी पुस्तकासह पंचायत समिती कार्यालयात दाखल करून बिल काढण्यासाठी येथील ग्रामसेवक यांना तक्रारदाराने भेट घेऊन पाठपुरावा केला होता. त्यावेळी ग्रामसेवक बारगळ याने तक्रारदाराकडे बिल काढण्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे सहा हजार रुपयाची मागणी केली, त्यावेळी तक्रारदाराने सहा हजार रुपये नाईलाजास्तव दिले. मात्र पुन्हा ग्रामसेवक बारगळ याने २८ जुन रोजी तक्रारदाराला विहिरीचे बिल काढण्यासाठी तिघांचे मिळून साडेसात हजार रुपयांची मागणी केली.

    वारंवार होत असलेल्या पैशाच्या मागणीला कंटाळून तक्रारदाराने सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली होती. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लांबोटी येथील एका हॉटेलमध्ये सापळा लावला होता. ग्रामसेवक बारगळ हा तक्रारदाराकडून नऊ हजेरी पुस्तकाचे १२ हजार पाचशे रुपयाची मागणी करत होता

    पहिला हप्ता म्हणून साडेसात हजार रुपये तडजोडी अंती मागणी केली होती ती घेण्या अगोदरच एक चार चाकी गाडी तेथे येत असल्याचे लक्षात आल्याने ग्रामसेवकाने पैसे न घेता तेथून धुम ठोकली होती. नंतर तक्रारदाराने त्याची २८ मे पासून ते दिनांक १७ जूनपर्यंत भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो गावात आलाच नाही. उलट ग्रामसेवक बारगळ यानेच तक्रारदार यांच्या नातेवाईकांशी संपर्क करून माझ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार का दिली म्हणुन तुमच्या व तुमच्या नातेवाइकांची नावे चिठ्ठीत लिहून जीवाचे बरे वाईट करीन व अशी फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल करीन अशी धमकी दिली होती.

    या सर्व बाबी तपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामसेवक मंगेश बारगळ याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी ग्रामसेवक मंगेश बारगळ याला अटकही केली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक कविता मुसळे यांच्या पथकाने केली.