अखेर ‘त्या’ परिपत्रकात दुरुस्ती; जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांना मिळणार सन्मानाचे स्थान

    साेलापूर/शेखर गोतसुर्वे : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दोन जुलै रोजीच्या परिपत्रकात दुरुस्ती करून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना सन्मानाचे स्थान देण्याचे परिपत्रक जारी केले आहे. दैनिक ‘नवराष्ट्र’मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीची दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली आहे. कोरोनामुक्त झालेल्या गावांचा सत्कार सोहळ्यास जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य यांच्यासह आमदार-खासदार यांनाही निमंत्रित करण्याचे पत्रकाद्वारे सूचित करण्यात आले आहे. जिल्ह्यात बहुतांशी गावे कोरोनामुक्त झाल्यामुळे गाव पातळीवर लढवय्या ग्रामस्थांचा सत्कार प्राथमिक स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे.

    सदस्यांचा नामोउल्लेख टाळल्याने बहिष्कार

    कोरोनामुक्त गावांचा अधिकाऱ्यांच्या हस्ते गावात जाऊन सत्कार करण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढलेल्या  परिपत्रकावर जिल्हा परिषद सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत बहिष्कार टाकला. २ जुलै रोजी सीईओ दिलीप स्वामी यांनी गाव कोरोना मुक्त करणाऱ्या सरपंच ग्रामसेवक आणि ग्राम कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याचे परिपत्रक जारी केले होते. परिपत्रकात जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचा नामोउल्लेख टाळल्याने परिपत्रकावर बहिष्कार टाकण्यात आला. सीईअाे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करीत सदस्यांनी परिपत्रक दुरुस्त करण्याची मागणी केली हाेती.

    प्राथमिक शिक्षकांना उपस्थिती बंधनकारक

    सोलापूर जिल्ह्यातील ६७८ गावे कोरोनामुक्त झाली आहेत, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रयत्नामुळे गाव कोरोना मुक्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक, आणि जिल्हा परिषद सीईओ यांच्या मार्फत सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. हा सत्कार सोहळा गाव पातळीवर करण्यात येणार आहे. छोट्याशा स्वरूपात कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात यावी, अशी सूचना देण्यात आली आहे. सात ते नऊ जुलै पर्यंत कार्यक्रम होणार आहेत. गटविकास अधिकारी आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करून सत्कार सोहळा करण्यात येणार आहे. या सोहळ्यास प्राथमिक शिक्षकांना उपस्थित राहण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.