…म्हणून भाजपच्या दोन खासदारांसह ४६ जणांवर गुन्हा दाखल

    सोलापूर : विनापरवाना मोर्चा काढून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन खासदारांसह ४६ जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ जुलै रोजी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज चौक सोलापूर येथे घडली. याप्रकरणी पोसई सोमनाथ भानुदास देशमाने यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

    त्यांच्या फिर्यादीवरून भाजप खासदार डॉ.जयसिध्देश्वर, रणजित नाईक-निंबाळकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रशांत परिचारक, समाधान अवताडे,  राजेंद्र राऊत, नरेंद्र पाटील, विजयकुमार देशमुख, राम सातपुते यांच्यासह महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक नागेश भोगडे, शिवानंद पाटील, अमर पुदाले, संतोष भोसले, विनायक विटकर तसेच किरण शंकर पवार, (रा. जुनी पोलीस लाईन, मुरारजी पेठ, सोलापूर), राम अनिल जाधव, (रा. ११६, राघवेंद्र नगर, मुरारजी पेठ, सोलापूर), धैर्यशील मोहिते पाटील, शहाजी पवार, लक्ष्मणराव ढोबळे, अनंत जाधव, विक्रम देशमुख, सतिश ऊर्फ बिज्जु प्रधाने, राजु सुपाते यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    याबाबत अधिक माहिती अशी की, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमास मनाई आदेश पारित केले असताना, तरीदेखील किरण पवार व राम अनिल जाधव यांना त्यांचे मराठा क्रांती मोर्चाची परवानगी नाकारली आहे, असे कळवून देखील बेकायदेशीररित्या एकत्रित येऊन जमाव जमून पोलिसांनी दिलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष करून घोषणाबाजी केली. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने एकमेकांमध्ये सामाजिक अंतर न ठेवता आदेशाचे उल्लंघन करून इतरांच्या जीवितास धोका होईल, असे कृत्य केले आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंडले हे करीत आहेत.