सीना नदी परिसरात पूरसदृश्य स्थिती; पाकणीचा पूल पाण्याखाली

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ आणि माढा तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. यामुळे सीनेला पूर आल्याचं चित्र आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणीचा पूल पाण्याखाली गेला असून पुलावरून पाच फूट पाणी वाहत आहे. पाकणी आणि विरवडे गावचा संपर्क ही तुटला आहे. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्हा प्रशासन ही सतर्क झाले असून, नदीच्या काठावर असलेली गावे तसेच घरांना सूचना करण्यात आल्या आहेत.

    सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ आणि माढा तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. यामुळे सीनेला पूर आल्याचं चित्र आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणीचा पूल पाण्याखाली गेला असून पुलावरून पाच फूट पाणी वाहत आहे. पाकणी आणि विरवडे गावचा संपर्क ही तुटला आहे. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्हा प्रशासन ही सतर्क झाले असून, नदीच्या काठावर असलेली गावे तसेच घरांना सूचना करण्यात आल्या आहेत.

    2020 मध्ये ही सीनेला अनेक वर्षांनंतर मोठा पूर आला होता, त्यामुळे सोलापूर-मंगळवेढा, सोलापूर-विजापूर संपर्क तुटला होता. हजारोंच्या संख्येने घरांचे,शेतीचे नुकसान झाले होते. आता सलग पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने नदीचे पाणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    तसेचं सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये मागच्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. या पावसामुळे बार्शी-तुळजापूर, बार्शी-भूम महामार्गावरील वाहतूक ही बंद झाली आहे. तालुक्यातील दहा मंडळांत मिळून या पावसाची सरासरी 46 मिमी नोंद झाली आहे.

    दरम्यान आगळगाव मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे कंदलगाव शिवारातील सोयाबीन, उडीद, ऊस, कांदा आदी पिके पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान झालं आहे. आगळगाव परिसरात काल सांयकाळी झालेल्या पावसाने आगळगाव येथील नदिला पूर आल्याने उंबर्गे,भानसळे, खडकोणी सह अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच आगळगाव,काटेगाव, उंबर्गे, कळंबवाडी, धनगरवाडी गावाला पाणीपुरवठा करणारा कळंबवाडी तलाव भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.