judge

    सोलापूर : मराठी मिशन तसेच वायडर चर्च मिनिस्ट्रीज या ट्रस्टचे सोलापूरच्या जमिनीवर बेकायदेशीर घरे बांधून लाखो रुपये कमविले तसेच ट्रस्टशी कोणताही संबंध नसताना ट्रस्टच्या नावे विविध बँकेमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे खाते उघडून करोडो रुपयांचा अपहार केला, अशा आशयाची खाजगी फिर्याद ट्रस्टचे केअरटेकर व चीफ सिक्युरिटी ऑफिसर संभाजी शिवाजी खांडेकर यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी एस.एम. कनकदंडे यांच्या न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती.

    न्यायाधीशांनी या प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांना ताबडतोब आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे या प्रकरणात आपणास अटक होऊ नये म्हणून अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी, (वय 55 रा. सोलापुर), विकास भास्कर रणशिंगे (वय 60 रा.सोलापूर), संतोष सुरेश फरड, (वय 52 रा. सोलापूर) यांनी ऍड. मिलिंद थोबडे यांच्यामार्फत तर अशोक ससाने (वय 60 रा. सोलापूर) यांनी ऍड. जयदीप माने यांच्यामार्फत जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

    अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस ऍड. मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवादात मराठी मिशन व वायडर चर्च मिनिस्ट्रीज या चर्चच्या ट्रस्टींची दोन गट आहेत व त्यांच्यामध्ये ट्रस्टी निवडीबाबत न्यायालयात वाद चालू असून, फिर्यादीस ज्या ट्रस्टींनी नेमणूक केली. त्यांची निवडच न्यायालयात स्थगित आहे, अपहाराबाबतची रक्कम व ती कशा पद्धतीने केली, त्याबाबत सबंध फिर्यादीमध्ये संदिग्धता आहे. संपूर्ण केसचा पुरावा हा कागदपत्री आहे, त्यामुळे अटकेची गरज नाही, असा युक्तिवाद केला. तो मान्य करून न्यायाधीशांनी अर्जदारांना पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.

    यात अर्जदार नलिनी कलबुर्गी, विकास रणशिंगे व संतोष फरड यांच्यातर्फे ऍड. मिलिंद थोबडे, ऍड. विनोद सूर्यवंशी, ऍड. सतीश शेटे यांनी तर अशोक ससाने यांच्यातर्फे ऍड. जयदीप माने यांनी काम पाहिले. तर सरकारतर्फे ऍड. दत्तूसिंग पवार यांनी तर मूळ फिर्यादीतर्फे ऍड. संतोष न्हावकर यांनी काम पाहिले.